

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.)अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या पंजाब किंग्समध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात क्रिकेटपटूंची अदलाबदल (ट्रेड) निश्चित झाल्याची चर्चा आहे. या ट्रेडअंतर्गत, मुंबई इंडियन्ससोबतच्या दुसऱ्या कार्यकाळानंतर हार्दिक आता एका नवीन फ्रँचायझीमध्ये जाईल, तर अर्शदीप पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघात सामील होईल. पण, या कराराला अधिकृतपणे पुष्टी मिळण्यापूर्वी बीसीसीआयच्या मंजुरीची आवश्यकता आहे.
या बदलामुळे हार्दिकचा मुंबई इंडियन्ससोबतचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. दीर्घकाळ कर्णधार राहिलेल्या रोहित शर्माच्या जागी तो २०२४ च्या हंगामासाठी कर्णधार म्हणून संघात परतला होता. पण हे स्थित्यंतर अपेक्षेप्रमाणे झाले नाही. हार्दिकने कर्णधारपद स्वीकारल्यापासून गेल्या तीन हंगामांपैकी दोनमध्ये पाच वेळचा चॅम्पियन संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
अर्शदीप सिंगला संघातून बाहेर काढणे हा पंजाब किंग्ससाठी एक कठीण निर्णय होता, कारण तो बऱ्याच काळापासून या फ्रँचायझीशी जोडलेला होता. आयपीएलमधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि तो सध्या टी-२० या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
श्रेयस अय्यरने गेल्या दोन हंगामात पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली, फ्रँचायझीने गेल्या वर्षी २०१४ नंतर प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. २०२६ हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पंजाबने चांगली कामगिरी केली होती, पण दुसऱ्या टप्प्यात अचानक झालेल्या घसरणीमुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.
श्रेयस कर्णधार म्हणून कायम राहिल्याने, हार्दिक आता केवळ एक क्रिकेटपटू म्हणून पंजाब किंग्समध्ये सामील होईल. फ्रँचायझीला त्याच्या अष्टपैलू क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. पंजाब किंग्सला आशा आहे की हार्दिक त्यांच्या अष्टपैलू विभागाला अधिक मजबूत करेल. पण, अनेक दुखापतींमुळे त्याने गेल्या आयपीएल हंगामापासून कोणताही स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळलेला नाही.
दरम्यान, आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर, मुंबई इंडियन्सने आपल्या संघ व्यवस्थापनातही मोठे बदल केले आहेत. कायरन पोलार्ड मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहेत, तर रॉबिन उथप्पा (फलंदाजी प्रशिक्षक), मिचेल मॅकक्लेनाघन (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि टी. दिलीप (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे