काँग्रेसच्या देणग्यांमध्ये ७५ टक्क्यांची मोठी घट; वर्षभरात मिळाले केवळ १३०.७ कोटी रुपये
नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। काँग्रेस पक्षाच्या आर्थिक निधीमध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. पक्षाला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांमधून मिळालेला निधी २०२४-२५ च्या तुलनेत तब्बल ७५ टक्क्यांनी कमी झाला आह
Congress Party Funding Drop Election Commission Data Analysis Report


नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। काँग्रेस पक्षाच्या आर्थिक निधीमध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. पक्षाला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांमधून मिळालेला निधी २०२४-२५ च्या तुलनेत तब्बल ७५ टक्क्यांनी कमी झाला आहे. २०२४-२५ मध्ये काँग्रेसला अशा देणग्यांमधून ५१७.४ कोटी रुपये मिळाले होते. मात्र, २०२५-२६ मध्ये ही रक्कम घसरून केवळ १३०.७ कोटी रुपयांवर आली आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने सादर केलेल्या देणग्यांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार, २०२५-२६ मध्ये प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्टने काँग्रेसला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी १९ टक्के निधी दिला. विशेष म्हणजे, २०२४-२५ मध्ये या ट्रस्टचा वाटा एकूण देणग्यांमध्ये ४१.८ टक्के होता. मागील आर्थिक वर्षात काँग्रेसला देणगी देणारा प्रूडंट हा एकमेव निवडणूक ट्रस्ट ठरला. मात्र, या ट्रस्टकडून मिळालेल्या निधीतही मोठी घट झाली आहे. २०२४-२५ मध्ये प्रूडंटने काँग्रेसला २१६ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम २०२५-२६ मध्ये घटून केवळ २५ कोटी रुपये झाली.

काँग्रेसच्या देणग्यांमध्ये झालेल्या घसरणीमागे अनेक कारणे असू शकतात. २०२४-२५ हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने त्या काळात पक्षाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली होती. २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये काँग्रेसच्या देणग्यांमध्ये ८४ टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र, २०२५-२६ मधील १३०.७ कोटी रुपयांचा निधी २०२३-२४ मध्ये मिळालेल्या रकमेपेक्षाही जवळपास ५३ टक्क्यांनी कमी आहे. विशेष म्हणजे, २०२५-२६ मध्ये बिहार विधानसभा निवडणूक झाली होती. तसेच आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी येथील एप्रिल २०२६ मधील निवडणुकांची तयारी सुरू होती. अशा परिस्थितीतही देणग्यांमध्ये झालेली घट लक्षवेधी ठरली आहे.

प्रूडंट ट्रस्टव्यतिरिक्त काँग्रेसला देणगी देणाऱ्यांमध्ये स्टार सिमेंट लिमिटेडने ५ कोटी रुपये, सज्जन भजंका यांनी ४ कोटी रुपये, अफनान कन्स्ट्रक्शन्सने ३ कोटी रुपये, प्रेम कुमार भजंका यांनी २ कोटी रुपये, तर आयपीएसयूएम प्रोअॅडव्हायजर्स आणि एसएमएस बिल्डर्स यांनी प्रत्येकी १ कोटी रुपयांची देणगी दिली.

अहवालातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्येकी १ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या केवळ नऊ देणगीदारांकडून काँग्रेसला एकूण ४३ कोटी रुपये मिळाले. हा निधी पक्षाच्या एकूण देणग्यांपैकी जवळपास एकतृतीयांश आहे. दुसरीकडे, पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी देणगी देणाऱ्या १,३२१ जणांकडून एकत्रितपणे ३७.२ कोटी रुपये मिळाले. एकूण १,७३५ देणगी नोंदींमध्ये प्रत्येक देणगीची मध्यम रक्कम तीन लाख रुपये होती.

दरम्यान, काँग्रेसचा २०२५-२६ या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे पक्षाला कूपन जारी करून आणि त्यांची विक्री करून किती निधी मिळाला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. २०२४-२५ मध्ये या माध्यमातून काँग्रेसने ३५० कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा केला होता. त्यामुळे आगामी लेखापरीक्षण अहवालातून पक्षाच्या उत्पन्नाच्या अन्य स्रोतांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande