
रायपूर, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी छत्तीसगडमधील बस्तर येथे तैनात असलेल्या सुरक्षा दलांच्या जवानांसोबत दिवाळीचा पवित्र सण साजरा केला. एकेकाळी नक्षलवादाचा सर्वात मोठा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात सुरक्षा दलांनी बजावलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीचे आणि योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, “तुमच्या बलिदानामुळे आणि अतूट निष्ठेमुळेच आपण या भागातून नक्षलवादाचे दहशतवादी सावट पूर्णपणे संपवू शकलो आहोत.” या भागातून नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट झाल्यानंतर साजरी होणारी ही पहिली दिवाळी असल्याचेही त्यांनी सांगितले.
बस्तर येथे सुरक्षा दलांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. २०२६ सालची दिवाळी अभूतपूर्व असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, अनेक दशकांपासून सुरू असलेल्या नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाविरोधातील लढ्यात देशाने निर्णायक विजय मिळवला आहे. आज देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादमुक्त झाला आहे.पंतप्रधानांनी यापूर्वीच्या सरकारांवर जोरदार टीका करताना म्हटले की, एकेकाळी नक्षलवाद हा असाध्य आजार मानून परिस्थिती देवाच्या भरवशावर सोडून देण्यात आली होती. मात्र, २०१४ नंतर सरकारच्या ठाम राजकीय इच्छाशक्तीमुळे संपूर्ण चित्र बदलले.
जवानांच्या अदम्य धैर्याला सलाम करताना पंतप्रधानांनी एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली. गेल्या ४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मागील एका वर्षात कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय राखीव पपोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एकाही जवानाला प्राण गमवावे लागले नाहीत, असे त्यांनी सांगितले.२००४ ते २०१३ या काळातील भीषण परिस्थितीची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, त्या काळात नक्षलवाद्यांच्या मृत्यूच्या तुलनेत आपल्या जवानांच्या शहादतीची आकडेवारी अधिक असायची. आज मिळालेले यश हे सरकारची योग्य धोरणे, दृढनिश्चय आणि सुरक्षा दलांच्या शौर्याचे फलित आहे.
नक्षलवादाच्या जुन्या काळाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, माओवाद्यांविरोधातील हा लढा अजिबात सोपा नव्हता. नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांचा मतदानाचा अधिकारही हिरावून घेतला होता. परिस्थिती इतकी गंभीर होती की, एका वर्षात नक्षली हल्ल्यांची संख्या दोन हजारांपर्यंत पोहोचत होती.२०१० मधील दुर्दैवी घटनेची आठवण करून देताना पंतप्रधानांनी सांगितले की, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांशी लढताना सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. त्याच वर्षी घडलेल्या आणखी एका क्रूर घटनेत ४४ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
पंतप्रधान म्हणाले की, देशाला प्रगतीच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी ठाम निर्धार आणि अचूक रणनीतीच्या जोरावर शत्रूंचा सामना करणे आवश्यक होते. २०१४ मध्ये जनतेने त्यांना ‘प्रधानसेवक’ म्हणून देशाची सेवा करण्याची संधी दिल्यानंतर सरकारने ती राजकीय इच्छाशक्ती दाखवली, ज्याची दीर्घकाळापासून कमतरता होती. याचाच परिणाम म्हणून आज कोट्यवधी भारतीयांनी नक्षलवादाची भीती कायमची मागे टाकली आहे.देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या लष्कराप्रमाणेच देशांतर्गत सुरक्षा दलांचेही महत्त्व असल्याचे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या अंतर्गत भागात पोलीस आणि सुरक्षा दल बजावत असलेली भूमिका राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत असेल, तर बाह्य शत्रूंना डोके वर काढण्याचे धाडस होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१४० कोटी देशवासीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जवानांच्या निःस्वार्थ त्यागाचा आणि बलिदानाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात तैनात असलेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांनी दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.२०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी सीमेवर आणि दुर्गम भागांत तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची अनोखी परंपरा कायम ठेवली आहे.
करनपूर येथे जवानांमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधानांनी यावेळी विशेष भर देत सांगितले की, ज्या भागाने अनेक दशके नक्षलवादाचा त्रास सहन केला, तोच भाग आज शांतता आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाच्या रक्षकांच्या समर्पणाचे कौतुक करत पंतप्रधानांनी त्यांच्या शौर्याला सलाम केला आणि देशवासीयांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, मागील वर्षांप्रमाणे यंदाही त्यांनी देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांसोबतच दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.यापूर्वी शनिवारी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशातून त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच प्रत्येकाच्या जीवनात शांतता, सुख आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली होती.बस्तर हा अनेक वर्षांपासून डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाविरोधात राबवण्यात येणाऱ्या मोहिमांचे प्रमुख केंद्र राहिला आहे. या भागात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode