

* विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारात परतत आहेत; देशांतर्गत बचत वार्षिक सुमारे १.४ ट्रिलियन डॉलरवर
मुंबई, 08 नोव्हेंबर (हिं.स.) - दीपावलीच्या शुभ पर्वावर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) येथे पारंपरिक लक्ष्मीपूजन आणि मुहूर्त ट्रेडिंगचा सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने बोलताना एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी भारतीय अर्थव्यवस्था येत्या वर्षात अधिक वेगाने वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना चौहान म्हणाले की, देशाची आर्थिक पायाभरणी भक्कम असून त्याच्या जोरावर अर्थव्यवस्थेला गती मिळेल. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) पुन्हा भारतीय बाजारपेठेकडे वळत आहेत, तर देशांतर्गत बचत आता वार्षिक सुमारे १.४ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे, असेही त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाच्या आघाडीवर एनएसईने नॅनोसेकंद पातळीवरील प्रतिसादवेळ गाठल्याचे सांगत, किरकोळ गुंतवणूकदारांचा अनुभव अधिक सुलभ आणि सक्षम करण्यासाठी एक्स्चेंज कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात चौहान यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन, पद्मिनी कोल्हापुरे, शीबा अग्रवाल आणि चित्रपट निर्माते भरतबाला यांनी पारंपरिक लक्ष्मीपूजन केले आणि घंटानाद केला. कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित मान्यवरांना एनएसईच्या बेल आणि बुल प्रतीकाची फ्रेम स्मृतिचिन्ह म्हणून भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
परंपरा, एकोपा आणि भारतीय भांडवली बाजारांच्या चिरंतन भावनेचा उत्सव म्हणून हा सोहळा साजरा करण्यात आला. दीपावलीनिमित्त एनएसईच्या परिसरात रांगोळी, दिवे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी