येमेनमध्ये सौदीचे भीषण हवाई हल्ले; १३ मुलांसह ३३ जणांचा मृत्यू
सना, 08 नोव्हेंबर (हिं.स.)।येमेनच्या सना प्रांतात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १३ मुले आणि आठ महिलांचा समावेश आहे. हूती अधिकाऱ्यांनी रविवारी हा दावा केला. या हल्ल्यांमध्ये
येमेनमध्ये सौदीचे भीषण हवाई हल्ले; १३ मुलांसह ३३ जणांचा मृत्यू


सना, 08 नोव्हेंबर (हिं.स.)।येमेनच्या सना प्रांतात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १३ मुले आणि आठ महिलांचा समावेश आहे. हूती अधिकाऱ्यांनी रविवारी हा दावा केला. या हल्ल्यांमध्ये ३९ जण जखमी झाले आहेत. देशात पुन्हा सुरू झालेल्या गृहयुद्धामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.

हूतींच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अनीस अल-असबाही यांनी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनची राजधानी सना शहराच्या पूर्वेला असलेल्या अल-शरिया गावाला लक्ष्य केले. या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढून ३३ वर पोहोचला असून ३९ जण जखमी झाले आहेत.अल-असबाही यांनी सांगितले की, “मृतांमध्ये १२ पुरुष, आठ महिला आणि १३ मुलांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये १६ पुरुष, १० महिला आणि १३ मुलांचा समावेश आहे.”

हूतींच्या वृत्तसंस्थाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या वृत्तसंस्थेने आरोप केला की, “विमानांनी दोन वेळा हल्ले करून मदत आणि बचावकार्य करणाऱ्या पथकांनाही लक्ष्य केले.” इराणसमर्थित हूती संघटनेच्या वृत्तवाहिनीने या हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओही प्रसारित केला.वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ अल-शरिया गावात चित्रित करण्यात आला आहे. त्यामध्ये हल्ला झालेल्या ठिकाणाहून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. तसेच परिसरात मलब्याचे ढिगारे आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी नागरिकही दिसत आहेत.

येमेनमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा देणाऱ्या सौदी अरेबियाने या हवाई हल्ल्यांबाबतच्या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने शनिवारी एका निवेदनात रियाध प्रांताच्या दिशेने डागण्यात आलेले हूतींचे क्षेपणास्त्र रोखून नष्ट केल्याचे सांगितले.दुसरीकडे, हूती संघटनेने सौदी अरेबिया तसेच येमेनमधील सौदी सैनिक, लष्करी तळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. हूतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सरी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये संघटनेने सहा लष्करी मोहिमा राबवल्याचे सांगितले. या मोहिमांमध्ये सौदी अरेबियाची तेल कंपनी ‘अरामको’ची केंद्रे, रियाध विमानतळ तसेच दोन्ही देशांच्या सीमेलगत असलेल्या सौदीच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

येमेनमध्ये अनेक वर्षे तुलनेने शांतता राहिल्यानंतर जुलै महिन्यात हूती बंडखोर आणि सौदीसमर्थित सरकार यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला. मध्यपूर्वेत आधीपासूनच सुरू असलेल्या संघर्षादरम्यान युद्धाचा आणखी एक नवा मोर्चा उघडला गेला. त्यानंतर सौदी अरेबियाकडून हूतींच्या ठिकाणांवर सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. दुसरीकडे, तेलसंपत्तीने समृद्ध असलेल्या सौदी अरेबियाविरोधात हूती संघटनेनेही आपले हल्ले तीव्र केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande