‘दिवाळी हा प्रकाशाच्या विजयाचा सण’, शहबाज शरीफ यांच्याकडून जगभरातील हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा
इस्लामाबाद, 08 नोव्हेंबर (हिं.स.)।जगभरात आज दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यानिमित्त शेजारील देश पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने शरीफ यांच्य
‘दिवाळी हा प्रकाशाच्या विजयाचा सण’, शहबाज शरीफ यांच्याकडून जगभरातील हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा


इस्लामाबाद, 08 नोव्हेंबर (हिं.स.)।जगभरात आज दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यानिमित्त शेजारील देश पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने शरीफ यांच्या वतीने समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर पोस्ट करत जगभरातील हिंदू बांधवांना, विशेषतः पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू समुदायाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

शहबाज शरीफ यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “दिवाळीच्या या आनंददायी आणि मंगलमय प्रसंगी मी जगभरातील हिंदू समुदायाला, विशेषतः पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”ते पुढे म्हणाले की, दिवाळी हा द्वेष, असहिष्णुता आणि निराशेच्या अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. प्रकाशाचा हा सण मानवी नातेसंबंध आणि सामाजिक जीवनात शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देतो. उज्ज्वल, समृद्ध आणि आशादायी भविष्याबद्दल अढळ विश्वास हे दिवाळीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

शहबाज शरीफ यांनी म्हटले की, पाकिस्तानमधील हिंदू समुदाय हा देशाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे. पाकिस्तानी समाजात अस्तित्वात असलेल्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा हा अमूल्य सामाजिक वारसा आहे. पाकिस्तानला आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा अभिमान आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानची राज्यघटना अल्पसंख्याकांच्या धार्मिक आणि नागरी हक्कांच्या संरक्षणाची हमी देते. धर्म, श्रद्धा, वर्ण किंवा वंश कोणताही असला तरी सर्व नागरिकांचे अधिकार, सन्मान आणि धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. धार्मिक सलोखा, परस्पर ऐक्य आणि एकमेकांप्रती आदरभाव वाढवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, शांततापूर्ण, सर्वसमावेशक आणि समृद्ध राष्ट्राची उभारणी करणे हे आपले सामूहिक ध्येय आहे. विविध संस्कृती आणि परंपरांचा स्वीकार करणारा तसेच शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या तत्त्वांचे पालन करणारा समाज आपल्या सर्व नागरिकांना शिक्षण आणि आर्थिक प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देतो.

या विशेष प्रसंगी विविध धर्मांमधील सलोखा वाढवण्यासाठी, बंधुभावाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी तसेच शांतता, सहिष्णुता आणि परस्पर सामंजस्यावर आधारित उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संकल्प पुन्हा एकदा करूया, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दिवाळी साजरी करणारे पाकिस्तानमधील सर्व हिंदू बांधव या आनंदाच्या प्रसंगी सणाच्या उत्साही आणि मंगलमय परंपरांचा मनमुराद आनंद घेतील, तसेच समाजात शांतता, सद्भावना, आनंद, समृद्धी आणि आशेचा संदेश पसरवतील, अशी आशा असल्याचेही शहबाज शरीफ यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande