
रियाध, 08 नोव्हेंबर (हिं.स.)।सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अनेक जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. देशाच्या नागरी संरक्षण विभागाने संभाव्य धोक्याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केल्यानंतर काही वेळातच हे स्फोट झाले.
वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, शहरातील वित्तीय जिल्ह्यात तेल कंपनी सौदी अरामकोशी संबंधित एका इमारतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने रियाध आणि दक्षिणेकडील भागाच्या दिशेने डागण्यात आलेल्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांसह एकूण चार हुती क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तेल प्रकल्पांवर क्षेपणास्त्रे व ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
हुतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी दावा केला की, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून सौदी अरेबियातील महत्त्वाच्या सामरिक आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत सहा लष्करी मोहिमा राबवण्यात आल्या. येमेनविरोधात सौदी अरेबियाकडून करण्यात येणाऱ्या लष्करी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचे सारी यांनी सांगितले.
हुती प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पहिल्या मोहिमेत रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, तेल साठवणुकीच्या टाक्या आणि अरामकोच्या डिस्टिलेशन टॉवरला लक्ष्य करण्यात आले. दुसरा हल्ला खुरैस येथील अरामकोच्या ठिकाणांवर, तर तिसरा हल्ला दवादमी परिसरातील पंपिंग स्टेशन क्रमांक आठवर करण्यात आला. चौथ्या मोहिमेत नजरान येथील नॅशनल गार्ड छावणीतील सौदी लष्करी तुकड्यांना, पाचव्या मोहिमेत अल-जौफच्या पूर्वेकडील भागाला, तर सहाव्या मोहिमेत मारिब येथील सौदी लष्कराच्या तळांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये सौदीचे सैनिक ठार झाल्याचा दावाही हुती बंडखोरांनी केला आहे. मात्र, या दाव्याला स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हुती प्रवक्त्यांनी आरोप केला की, सौदी अरेबियाने गेल्या २४ तासांत सना, अल-जौफ, ताइज, सादा आणि मारिब यांसह अनेक प्रांतांमध्ये १०५ हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला.संघर्ष तीव्र झाल्यापासून सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने आतापर्यंत ४,३६९ हल्ले केल्याचा दावा सारी यांनी केला. सौदी अरेबियाच्या हद्दीत लष्करी कारवाया सुरूच ठेवण्याचा इशारा देताना, नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून नाकेबंदी आणि हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हल्ला करण्याच्या धोरणावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारने लेबनॉनला हुती मिलिशियाला हिजबुल्लाकडून मिळणारी लष्करी मदत रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.येमेनच्या परराष्ट्रमंत्री अफराह अल-जौबा यांनी दोन्ही देशांच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्याची मागणी केली.या ताज्या लष्करी संघर्षामुळे २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने झालेला युद्धविराम पूर्णपणे मोडीत निघाला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावाशी संबंधित या घडामोडींमुळे येमेनमधील १२ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध पुन्हा भडकले आहे. परिणामी, जगातील सर्वांत गंभीर मानवतावादी संकटांपैकी एक असलेले संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (आयओएम) माहितीनुसार, संघर्षाच्या या नव्या टप्प्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode