
मुंबई, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि विविध कलाविष्कारांनी गेल्या चार दिवसांपासून रसिकांना सांस्कृतिक आनंदाची पर्वणी देणाऱ्या पु. ल. कला महोत्सवाची रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशीही रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरेल वाद्यसंगीताच्या मैफलीने दिवसाची सुरुवात झाली, तर पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी लेखनातून साकारलेल्या नाट्यप्रयोगाने महोत्सवाचा समारोप रंगतदार केला.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात प्रभादेवी येथील कलांगणात आयोजित ‘नादमधुर पहाट’ या विशेष वाद्यसंगीताच्या कार्यक्रमाने झाली. विविध वाद्यांच्या सुरेल संगमातून साकारलेल्या या मैफलीत तबला, ढोल, बासरी, क्लॅरिनेट, साइड रिदम आणि की-बोर्ड अशा वाद्यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. पं. शंकरकुमार दांडगे आणि सहकाऱ्यांनी आपल्या वादनातून पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सुरांची रंगत भरली. विविध वाद्यांचे स्वर आणि ताल यांच्या अनोख्या मेळामुळे उपस्थित रसिकांना एक वेगळाच संगीतानुभव मिळाला.
यानंतर रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘या इथे चाळ बटाट्याची’ या विनोदी संगीत नाटकाचा प्रयोग सादर झाला. पु. ल. देशपांडे यांचे मूळ लेखन व संगीत लाभलेल्या या नाटकाचे नाट्यरूपांतर योगेश सप्रे यांनी केले असून देवेंद्र भोमे यांचे संगीत दिग्दर्शन आणि देवेंद्र भोमे व योगेश सप्रे यांचे दिग्दर्शन लाभले. कलाकारांच्या प्रभावी अभिनयातून आणि विनोदाच्या अचूक टायमिंगमधून नाटकातील प्रसंग अधिक खुलत गेले. पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शर्मिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे आणि साक्षी देशपांडे यांनी आपल्या अभिनयाने प्रयोगात रंगत आणली.
या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे *दादर येथील इस्माईल लतीफ अहमद सेलर चाळीतील सुमारे ५० कुटुंबांची उपस्थिती*. एकत्रितपणे नाटकाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या कुटुंबांनी प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाटकातील विनोदी प्रसंगांवर मनमुराद हसताना काही भावस्पर्शी क्षणांनी त्यांच्या डोळ्यांत अश्रूही तरळले. हसू आणि भावुकता अशा दोन्ही भावनांचा अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटत होता. सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत रंगभूमीचा आनंद पोहोचवणारा हा सहभाग महोत्सवाच्या सांगतेतील एक हृद्य क्षण ठरला.
*विजय केंकरे* - मराठी रंगभूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होण्याची गरज आहे. आपल्याकडे उत्तम व्हिज्युअल्स आहेत, उत्तम सूर आहेत आणि सादरीकरणाची ताकदही आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीची गुणवत्ता देशभर पोहोचू शकते. अशा कलाकृतींचे भारतभर प्रयोग व्हायला हवेत. हे सहज शक्य आहे. प्रत्येक महोत्सवात अनेक कलाकार सहभागी होतात. कुठे चाळीस, तर कुठे पन्नास कलाकार नाटकात काम करतात. मात्र प्रत्येक कलाकाराचे योगदान महत्त्वाचे असते. या सर्वांनी अतिशय अप्रतिम काम केले आहे.
अशा दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पु. ल. कला अकादमीचे मी मनापासून आभार मानतो. या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत आणि ते अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, हीच अपेक्षा आहे. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. विशेषतः पायडीचे कौतुक करायलाच हवे... त्याचे कौतुक तर आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत; पण आज पुन्हा एकदा त्याचे विशेष अभिनंदन! खूप मजा आली. सर्वांचे मनापासून धन्यवाद!”
*अभिनेते सुमित राघवन* यांनीही महोत्सवातील कलाकारांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. मराठी रंगभूमीकडे असलेली कलात्मकता, उत्तम दृश्यात्मकता आणि संगीताची ताकद अधोरेखित करत अशा दर्जेदार कलाकृतींचे प्रयोग केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक कलाकाराचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी रंगमंचावरील तसेच पडद्यामागील सर्व कलाकारांचे विशेष अभिनंदन केले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने अशा उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पु. ल. कला महोत्सव २०२६’ ची आज यशस्वी सांगता होत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका सौ. मीनल जोगळेकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा कला महोत्सव साकार झाला. या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व संस्था, त्यांचे रंगमंचावरील कलाकार तसेच रंगमंचामागे कार्यरत असलेल्या तंत्रज्ञ आणि सहकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे या महोत्सवाची शोभा अधिकच वाढली. या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तसेच, गेल्या चार दिवसांपासून या महोत्सवाला उपस्थित राहून प्रत्येक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने विशेष आभार मानतो. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने सांगता समारंभात संस्थेचे प्रतिनिधी विलास ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या सर्वांच्या सहभागामुळे हा महोत्सव संस्मरणीय ठरला. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!” या सांगता समारंभाला माजी मुख्यमंत्री सचिव नितीन करीअर आणि जे. पी. डांगे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच अभिनेते सुमित राघवन, संस्थेचे विलास ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहभागी संस्थांचे प्रतिनिधी आणि कलाकार उपस्थित होते.
पु. ल. देशपांडे यांच्या बहुआयामी साहित्यिक आणि कलात्मक विश्वाचा अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवतानाच सर्वसामान्य रसिकांनाही कलेशी जोडणारा हा महोत्सव आनंददायी आठवणी देत दिमाखात संपन्न झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर