जळगावात एफडीएचा मोठा छापा; ७.६५ लाखांचे तेल जप्त
जळगाव, 09 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीच्या सणासुदीत खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली असतानाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील तेल उत्पादक कंप
जळगावात एफडीएचा मोठा छापा; ७.६५ लाखांचे तेल जप्त


जळगाव, 09 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीच्या सणासुदीत खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली असतानाच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील तेल उत्पादक कंपन्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कंपनीकडून तब्बल ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४ हजार ४२५ किलो खाद्यतेल जप्त करून सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तेल उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खाद्यतेलासह मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या काळात ग्राहकांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव एमआयडीसीतील सात प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांची पथकाने कसून तपासणी केली.या तपासणीदरम्यान एका कंपनीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत कंपनीतील ४ हजार ४२५ किलो तेलाचा साठा जप्त करून सील केला. या तेलाची किंमत ७ लाख ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त होईपर्यंत हा साठा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, किशोर साळुंखे आणि आकाश बोराडे यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande