दिवाळीच्या रात्री अग्नितांडव; मध्य प्रदेशात दोन कुटुंबांतील १२ जणांचा होरपळून मृत्यू
कटनीमध्ये दोन महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील सहा सदस्य जिवंत जळाले -सिवनीच्या छपारा येथेही इतर सहा जणांचा मृत्यू भोपाळ, ९ नोव्हेंबर (हिं.स.)मध्य प्रदेशात दिवाळीची रात्र दोन कुटुंबांसाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना ठरली. कटनी जिल
दिवाळीच्या रात्री अग्नितांडव


-कटनीमध्ये दोन महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील सहा सदस्य जिवंत जळाले

-सिवनीच्या छपारा येथेही इतर सहा जणांचा मृत्यू

भोपाळ, ९ नोव्हेंबर (हिं.स.)मध्य प्रदेशात दिवाळीची रात्र दोन कुटुंबांसाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना ठरली. कटनी जिल्ह्यातील बरही आणि सिवनी जिल्ह्यातील छपारा येथील घरांना लागलेल्या भीषण आगीत १२ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष आणि पाच मुलांचा समावेश आहे. कटनीमध्ये दोन महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाला. सिवनीच्या छपारा येथील आगीतही एकाच कुटुंबातील सहा सदस्यांनी आपला जीव गमावला. घरात अडकलेल्या २० पैकी आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनांनंतर दोन्ही भागांमध्ये शोककळा पसरली आहे.

कटनी: दोन महिन्यांच्या बाळासह सहा जणांचा मृत्यू

कटनी जिल्ह्यातील बरही येथे दिवाळीच्या रात्री सुमारे १२ वाजता पुरण अग्रवाल यांच्या भांड्यांच्या दुकानात अचानक आग लागली. ही आग दुकानाच्या शेजारील तीन मजली इमारतीत वेगाने पसरली. आग आणि धुरामुळे आत असलेले कुटुंबीय बाहेर पडू शकले नाहीत. या दुर्घटनेत ७७ वर्षीय पुरण अग्रवाल, त्यांची पत्नी चंद्रकला (७४), सून पूनम, १४ वर्षीय आर्या, सहा वर्षीय अन्वी आणि दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. रितेश अग्रवाल आणि त्यांची मेहुणी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. आगीच्या ज्वाला पाहून त्यांनी आरडाओरडा केला, पण तोपर्यंत आग इमारतीच्या मोठ्या भागात पसरली होती. कुटुंबातील इतर सदस्य आत अडकले.

सकाळपर्यंत बचावकार्य सुरू, जेसीबीने भिंत पाडली

आग लागल्यानंतर रात्रभर बचावकार्य सुरू होते. पुरण अग्रवाल यांना पहाटे ४:३० च्या सुमारास वाचवण्यात आले. त्यानंतर, पहाटे ६:३० च्या सुमारास, जेसीबीच्या मदतीने घराची भिंत तोडून कुटुंबातील इतर पाच सदस्यांना वाचवण्यात आले. यामध्ये दोन महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. मात्र, तोपर्यंत त्या सर्वांचा मृत्यू झाला होता.

अग्निशमन वाहनांमुळे आग विझवण्यात अडथळा

बरही येथील आगीतील अग्निशमन यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. स्थानिक वृत्तानुसार, आग लागल्यानंतर सुमारे एका तासाने, पहाटे १ वाजता बरही नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले, पण त्याचा पाईप तुटलेला आढळला. सुमारे दीड तासाने विजयराघवगडहून दुसरे अग्निशमन वाहन आले, पण त्याचाही पाईप सदोष असल्याचे आढळले. त्यानंतर, कैमोर आणि कटनी येथून अग्निशमन वाहने बोलावण्यात आली. अग्निशमन वाहनांमधील तांत्रिक समस्यांमुळे आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाला. जेसीबीच्या मदतीने भिंत तोडून बचावकार्य करण्यात आले. यावेळी बरही येथील स्थानिक तरुणांनीही पुढाकार घेऊन मदतकार्यात हातभार लावला. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन यंत्रणा आणि प्रशासकीय व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, घटना घडूनही पहाटे ४ वाजेपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. दिवाळीसारख्या मोठ्या सणासाठी पुरेशी अग्निशमन व्यवस्था करायला हवी होती, असे ते म्हणाले.

सेवनी: छपारा येथे सराफा व्यापाऱ्याच्या घरात आग, सहा जणांचा मृत्यू

दुसरी घटना सेवनी जिल्ह्यातील छपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर वॉर्ड क्रमांक ७ मध्ये घडली. सोमवारी पहाटे ४ ते ४:३० च्या दरम्यान जैन मंदिराच्या जवळ असलेल्या सराफा व्यापारी कुंदन सोनी यांच्या घरात आग लागली. घटनेच्या वेळी घरात दहा कुटुंबीय उपस्थित होते. आग वेगाने पसरल्याने सहा जण आत अडकले, तर चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या अपघातात कुंदन लाल सोनी (७५), राजकुमारी सोनी (६५), रितू सोनी (४२), स्मृती सोनी (४०), सूर्य सोनी (४५) आणि आदित्य सोनी (१६) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अमायरा सोनी (७), रितेश सोनी (४५), सौरभ सोनी (४३) आणि आकर्ष सोनी (१४) यांना वाचवण्यात आले.

आगीचे कारण अस्पष्ट असून, पोलीसांकडून तपास सुरु

माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आग संपूर्ण घरात पसरली होती. बचाव पथकांनी आग विझवण्याचा आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीचे नेमके कारण सध्या अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की इतर संभाव्य कारणांमुळे, याचा तपास सुरू आहे. पुढील माहिती आणि प्रशासकीय पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. छपरा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande