
नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वैचारिक नक्षलवाद’ या विधानावरून पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशविरोधी कोण आहे आणि परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर कोण काम करत आहे, या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी आपल्याशी समोरासमोर खुली आणि सार्वजनिक चर्चा करावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधी यांनी सीआरपीएफ जवानांना उद्देशून म्हटले की, प्रिय सीआरपीएफ जवानांनो, तुमच्या चेहऱ्यावरील भावांतून सर्व काही स्पष्ट होत होते. पंतप्रधानांच्या खोट्या विधानांवर तुमचा विश्वास बसला नव्हता.पुढे त्यांनी म्हटले की, आम्हाला नक्षलवादी ठरवण्यात आले. मात्र, माझे आव्हान आजही कायम आहे. देशविरोधी कोण आहे आणि परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण काम करत आहे, यावर पंतप्रधानांनी माझ्याशी खुली चर्चा करावी. ही चर्चा कधीही आणि कुठेही करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांच्यात कोणत्याही जवानासमोर उभे राहण्याचे धाडस उरणार नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.दरम्यान, रविवारी छत्तीसगडमधील बस्तर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सावधगिरीचा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधत पुन्हा एकदा थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode