
सरसंघचालकांनी विषद केली 1930 च्या दशकातील घटना
नागपूर, 09 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या सुरुवातीच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण आणि फारशा चर्चेत नसलेल्या घटनेचा उल्लेख केला. स्वातंत्र्यापूर्वी 1930 च्या दशकात मध्य प्रांताच्या विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असताना इब्राहिम नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने संघाच्या समर्थनार्थ आवाज उठवला होता, अशी माहिती भागवत यांनी दिली.
नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडच्या मुख्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, त्या काळात विधानसभेत संघाची बाजू मांडण्यासाठी एकही स्वयंसेवक उपस्थित नव्हता. तसेच संघाच्या विचारसरणीचे समर्थन करणारी व्यक्तीदेखील तेथे नव्हती. मात्र, अशा परिस्थितीत इब्राहिम नावाच्या व्यक्तीने संघाच्या बाजूने भूमिका मांडली होती. संघ जातीयवादी नसल्याने त्यावर बंदी घालू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
इब्राहिम यांच्या विधानसभेतील भाषणाचा संदर्भ देताना भागवत म्हणाले की, “हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, असे म्हणणाऱ्यांना मनोरुग्णालयात पाठवले पाहिजे, असे मला वाटते. मात्र, मी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना वैयक्तिकरीत्या ओळखतो. ते वेडे नाहीत, तर एक चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीयवादी असू शकत नाही असे इब्राहिम यांनी आपल्या तत्कालिन भाषणात म्हंटले होते. त्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख फारशी व्यापक नसली, तरी डॉ. हेडगेवार यांना समाजात मोठा आदर होता, असे भागवत यांनी नमूद केले. संघाच्या स्थापनेपासूनच स्वयंसेवकांनी संघाची खरी ओळख निर्माण केली आहे. आज 100 वर्षांनंतरही स्वयंसेवक हेच संघाचे खरे सामर्थ्य आणि ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचारकांचे समर्पित जीवन हीच संघाची ताकद
संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या अर्थात प्रचारकांच्या जीवनशैलीविषयी बोलताना भागवत यांनी त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचे कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी क्षमता, कौशल्ये आणि मानवी गुण असतात; मात्र प्रचारकांना एकत्र बांधणारी गोष्ट म्हणजे त्यांचे संघकार्याप्रती असलेले संपूर्ण समर्पण, असे ते म्हणाले. मी स्वतः प्रचारक आहे. अनेक वर्षांपासून प्रचारकांना जवळून पाहिले आहे. त्यांची जीवनशैली आता माझ्या स्वभावाचा एक भाग बनल्याचे भागवत यांनी सांगितले.प्रचारकांविषयी लोक जेव्हा लिहितात, तेव्हा त्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसतो. तर त्यांच्याविषयी असलेले प्रेम, आदर आणि आत्मीयता यामुळेच ते लिहितात. संघाच्या कार्यातून कोणतेही भौतिक लाभ मिळत नसतानाही प्रचारक आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
साडेसात लाख स्वयंसेवकांपैकी सुमारे 4 हजार पूर्णवेळ कार्यकर्ते
स्वयंसेवकाच्या जीवनातील त्याग आणि समर्पण अधोरेखित करताना भागवत म्हणाले की, खरा स्वयंसेवक अहंकार, वैयक्तिक अपेक्षा आणि स्वार्थ यांपासून दूर राहून समाजाच्या कल्याणासाठी कार्य करतो. आज देशात सुमारे 70 ते 75 लाख स्वयंसेवक असल्याचे सांगत, त्यापैकी जवळपास चार हजार पूर्णवेळ प्रचारकांनी आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून देशाच्या भविष्याच्या उभारणीसाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्वयंसेवकाचे जीवन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे आहे. स्वतःचा अहंकार, स्वार्थ आणि वैयक्तिक अपेक्षा बाजूला ठेवून समाजासाठी आपण किती सकारात्मक योगदान देऊ शकतो, याचा विचार करणे हीच स्वयंसेवकाची खरी ओळख असल्याचे भागवत म्हणाले.
जगाचे भारताकडे अपेक्षेने लक्ष
स्वयंसेवकाच्या जीवनातील त्यागाचे महत्त्व स्पष्ट करताना भागवत यांनी पारंपरिक धार्मिक विधींचा संदर्भ दिला. सामान्यतः विवाहानंतर उपनयन किंवा मुंज यांसारखे धार्मिक संस्कार केले जातात; मात्र स्वयंसेवकाच्या जीवनात त्याग आणि समर्पणाला सर्वप्रथम स्थान असते, असे त्यांनी सांगितले.जागतिक स्तरावर वेगाने बदलणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समाज मजबूत, शिस्तबद्ध आणि एकसंघ असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना भागवत यांनी संघाची प्रगती कोणाच्या बाह्य मदतीमुळे किंवा कृपेमुळे झालेली नसून स्वयंसेवकांचे समर्पण, निःस्वार्थ सेवा आणि चारित्र्य यांच्या बळावरच संघाने आपली ओळख निर्माण केली असल्याचे अधोरेखित केले.संघाची खरी ओळख ही त्याच्या इमारती, पदाधिकारी किंवा बाह्य प्रसिद्धीत नसून निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये आहे, असा संदेश मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून दिला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी