
नाशिक, 09 नोव्हेंबर (हिं.स.)।
नाशिक क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील अतिशय आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारची २३ वर्षांखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी महाराष्ट्र संघाचे एलिट गटातील टी-ट्वेण्टी साखळी सामने भिलाई व रायपुर येथे शनिवार १४ नोव्हेंबर पासून होणार आहेत.
मागील हंगामात देखील बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेण्टी एलिट ट्रॉफी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारने सलामीला खेळत पंजाब , सौराष्ट्र व झारखंड वरील विजयात महाराष्ट्र महिला संघातर्फे खेळताना फलंदाजीत प्रभावी कामगिरी करत महाराष्ट्राच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.
सलामीची फलंदाज ईश्वरी सावकारने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. ईश्वरीची गेली काही वर्षे , महिलांच्या १९ तसेच २३ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील हाय परफॉरमन्स शिबिरासाठी निवड होत आली आहे. २०२२ मध्ये महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफी साठी १९ वर्षांखालील इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. त्या स्पर्धेत श्रीलंका व वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चांगली कामगिरी केल्याने ईश्वरीची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात नियमितपणे निवड होत आहे. त्याच हंगामात १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली होती व तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये , ईश्वरी सावकारला, २०२२-२३ च्या हंगामात १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन - एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट - बेस्ट - क्रिकेटपटूचे पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंच्या यादीत नाशिकच्या ऐश्वर्या वाघचा देखील समावेश झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित , २३ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे साखळी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत- १४ नोव्हेंबर-हैद्राबाद, १५ नोव्हेंबर- बिहार, १९ नोव्हेंबर-कर्नाटक व २१ नोव्हेंबर-झारखंड .
राष्ट्रीय पातळीवरील ईश्वरी सावकारच्या या अतिशय महत्वपूर्ण निवडी बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सर्व पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे खास अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
--
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI