
नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर (हिं.स.) केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी सोमवारी खेलो इंडिया युवा खेळ २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ११ ते २२ डिसेंबर दरम्यान तेलंगणामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २८ खेळांचा समावेश असेल, ज्यात २७ स्पर्धात्मक आणि एका प्रात्यक्षिक खेळाचा समावेश आहे. खेलो इंडिया कार्यक्रमाच्या इतिहासात प्रथमच तेलंगणा या स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
२२ खेळांमधील पदकांच्या स्पर्धा हैदराबादमधील विविध ठिकाणी आयोजित केल्या जातील, ज्यात लाल बहादूर शास्त्री स्टेडियम कॉम्प्लेक्स, बशीरबाग आणि मॉडर्न गचीबोवली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे. खम्मम (तिरंदाजी), हनुमाकोंडा (ॲथलेटिक्स), करीमनगर (जुडो), निझामाबाद (टेबल टेनिस) आणि महबूबनगर (कबड्डी).
डॉ. मांडविया म्हणाले, खेलो इंडिया युवा खेळ २०२६ चे वेळापत्रक जाहीर करताना मला आनंद होत आहे. या स्पर्धेने खेळो इंडिया स्पर्धांच्या मालिकेची सुरुवात होईल. गेल्या काही वर्षांपासून, या स्पर्धांनी प्रतिभावान खेळाडूंना त्यांची क्षमता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यानंतर हे खेळाडू आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्टतेच्या मार्गावर प्रगती करतात. खेळो इंडिया युवा खेळ आयची-नागोया येथील आशियाई खेळांनंतर लगेचच आयोजित केले जात आहेत, त्यामुळे आम्हाला काही उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
या १२ दिवसीय क्रीडा स्पर्धेत अंदाजे ६,००० खेळाडू आणि १,८०० सहाय्यक कर्मचारी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सॉफ्टबॉलचा स्पर्धात्मक खेळ म्हणून प्रथमच समावेश केला जाईल, तर सेलिंगचा (नौकायन) खेलो इंडिया युवा खेळांच्या कार्यक्रमात प्रथमच समावेश केला जाईल. पण, सेलिंग हा खेळ पदक स्पर्धा म्हणून नव्हे, तर प्रात्यक्षिक खेळ म्हणून आयोजित केला जाईल.
डॉ. मांडविया म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, क्रीडा परिसंस्था अशा प्रकारे विकसित झाली पाहिजे की आपण ऑलिम्पिकमध्ये शक्य तितक्या जास्त खेळांमध्ये सहभागी होऊ शकू. पंतप्रधानांनी असेही म्हटले आहे की, आपण समुद्र आणि पर्वत यांसारख्या नैसर्गिक संसाधनांद्वारे खेळल्या जाणाऱ्या खेळांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सेलिंग हा असाच एक खेळ आहे. आम्हाला अत्यंत आनंद आहे की आमचे सेलिंग खेळाडू या खेळांचा भाग बनतील आणि आपल्या खेळाला प्रोत्साहन देण्यास मदत करतील.
खेलो इंडिया युवा खेळांचा मागील हंगाम ३ ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्राने ५८ सुवर्ण, ४७ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांसह एकूण १५८ पदके जिंकून विजेतेपद पटकावले. हे महाराष्ट्राचे पाचवे खेलो इंडिया युवा खेळांचे विजेतेपद आणि सलग तिसरे यश होते.
दोन वेळच्या विजेत्या हरियाणाने ३९ सुवर्ण, २७ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांसह एकूण ११७ पदके जिंकून दुसरे स्थान पटकावले. राजस्थानने २४ सुवर्ण, १२ रौप्य आणि २४ कांस्य पदकांसह एकूण ६० पदके जिंकून तिसरे स्थान पटकावले.
बिहार स्पर्धेत एकूण २६ विक्रमांची नोंद झाली. यापैकी आठ विक्रम मुलींनी नोंदवले, ज्यात वेटलिफ्टिंगमधील पाच राष्ट्रीय युवा विक्रमांचा समावेश आहे.
तेलंगणा खेळांमध्ये समाविष्ट असलेले २७ स्पर्धात्मक खेळ:
तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फेन्सिंग, फुटबॉल, गटका, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युडो, कबड्डी, कलरीपयट्टू, खो-खो, मल्लखांब, रोइंग, शूटिंग, जलतरण, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, टेनिस, थांग-टा, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि योग.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे