
अहमदाबाद, 09 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी अहमदाबादमधील बडाज परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या ७०० हून अधिक घरांचे उद्घाटन केले. यासोबतच तब्बल १,०२४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण करून ते शहरवासीयांना समर्पित केले. यावेळी उपस्थित नागरिकांना त्यांनी दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, आज सुमारे १,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. यापैकी जवळपास १,१०० कोटी रुपयांची कामे अहमदाबाद महानगरपालिकेशी संबंधित आहेत. तर रस्ते व इमारत विभाग तसेच केंद्र सरकारच्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा यात समावेश आहे.आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना अमित शाह यांनी रामापीर टेकरा परिसराचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, १९८५ मध्ये या भागात मतदार ओळखपत्रे आणि प्रचारपत्रके वाटण्यासाठी जात असताना परिसराची अवस्था अत्यंत दयनीय होती. ठिकठिकाणी सांडपाण्याचे नाले वाहत होते, पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती, आजारांचे प्रमाण मोठे होते आणि किरकोळ गुन्हेगारीच्या घटनाही घडत असत. परंतु. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. आज रामापीर टेकरा येथील नागरिकांना खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या दर्जाला साजेशी स्वच्छ आणि आधुनिक घरे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या घरांमध्ये पंख्यांसारख्या मूलभूत सुविधांचाही समावेश आहे.संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील ५५ हजारांहून अधिक नागरिकांना सामाजिक सुरक्षा, मनोरंजन, ग्रंथालय, शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बोपल-घुमा येथे उभारण्यात येणाऱ्या पंप हाऊसच्या भूमिपूजनाचाही अमित शाह यांनी उल्लेख केला. पावसाळ्यात या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या निर्माण होते. हा भाग आपला आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याचे सांगत, यापुढे परिसरात पाणी साचणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच काली चौदशीच्या निमित्ताने झालेल्या बैठकीतील चर्चेचा संदर्भ देत अमित शाह यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर चिंता व्यक्त केली. नशामुक्ती हा समाजासमोरील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, तुम्ही फक्त १०३३ या क्रमांकावर एक फोन करा. गुजरात सरकार अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना तुरुंगात पाठवेल.अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त होत असून, या अवैध व्यवसायातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी दोन महत्त्वपूर्ण उद्दिष्टे जाहीर केली. डिसेंबर २०२८ पर्यंत गुजरात राज्य पूर्णपणे नशामुक्त करण्याचे, तर डिसेंबर २०२९ पर्यंत संपूर्ण देश नशामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.समाजातील नागरिकांनी तसेच पालकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहनही अमित शाह यांनी केले. अमली पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी