
अकोला, 13 फेब्रुवारी (हिं.स.)।
सीमेवर आमचे जवान रक्त सांडत असताना आणि पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद सुरू असताना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणे, हा देशप्रेमी जनतेचा अपमान आहे. रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत, अशी ठाम भूमिका घेत हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आज अकोला येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 'आयसीसी टी-२० वर्ल्ड कप'मधील भारत-पाक सामन्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
*जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक*
आज १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. या वेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, केवळ हस्तांदोलन टाळून पाकिस्तानचा निषेध करणे पुरेसे नाही, तर जोपर्यंत आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवू नयेत.
*समितीच्या प्रमुख मागण्या आणि भूमिका*:
रक्त आणि खेळ एकत्र नको: ज्याप्रमाणे 'सिंधू जल करारा'च्या वेळी भारताने पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही अशी भूमिका घेतली होती, तशीच भूमिका क्रिकेटबाबतही घ्यावी.
*खेळाडूंची भारतविरोधी मानसिकता*: शाहीद आफ्रिदी, जावेद मियांदाद आणि शोएब अख्तर यांसारखे खेळाडू सातत्याने काश्मीर आणि भारताच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत असतात. अशा मनोवृत्तीच्या देशासोबत खेळणे अयोग्य आहे.
*कठोर भूमिकेची गरज*: नुकतेच बांगलादेशी खेळाडूंवर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली, तशीच कठोर भूमिका केंद्र सरकारने पाकिस्तानबाबतही घ्यावी.
राज्यभरात आंदोलनाचे लोण
अकोल्याप्रमाणेच पुणे (राजाराम पूल), अहिल्यानगर (दिल्ली गेट), सातारा आणि कोल्हापूर येथेही मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्यात आली आहेत.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, भारत सरकारने या वर्ल्ड कपमधील पाकिस्तानसोबतचा सामना रद्द करून देशहिताला प्राधान्य द्यावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे