
अकोला, 13 फेब्रुवारी (हिं.स.)।
जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालय, अकोला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गुरुवारी अचानक केलेल्या पाहणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचा दावा आ. पठाण यांनी केला. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा, स्वच्छतेची अवस्था, डॉक्टरांची अनुपस्थिती तसेच वॉर्डमधील नर्सेस, वार्डबॉय आणि सुरक्षा रक्षकांकडून मिळणाऱ्या कथित उद्धट वागणुकीच्या तक्रारींमुळे वातावरण चांगलेच तापले.
मागील काही महिन्यांपासून रुग्णालयातील एकूणच व्यवस्था कोलमडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या. विशेषत: रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. काही ठिकाणी अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याचे, तर काही वॉर्डमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे पाहणीत समोर आले. अनेक वेळा डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याच्या तक्रारीही रुग्णांनी केल्याचे आ. पठाण यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
पाहणीदरम्यान मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रुग्णांना देण्यात येणारे जेवण प्रत्यक्ष तपासून त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. वॉर्डनिहाय पाहणी करताना काही ठिकाणी रुग्णांच्या तक्रारी, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या मर्यादा आणि मनुष्यबळाची कमतरता समोर आल्याचे सांगण्यात आले. रुग्ण व नातेवाईकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
दरम्यान, एका वॉर्डमध्ये महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांनी तेथे उपस्थित असलेल्या नर्स व सुरक्षा रक्षकांकडून मिळणाऱ्या कथित उद्धट वागणुकीबाबत तक्रार केली. त्यानंतर आ. पठाण यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कणखर शब्दांत जाब विचारला. या घटनेनंतर काही कर्मचारी संतप्त झाल्याची माहिती समोर आली.
याबाबत नर्स स्टाफकडूनही प्रतिक्रिया समोर आली असून, “आमदार महोदयांनी उद्धट भाषेचा वापर केला,” असा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केल्याची चर्चा आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना आ. पठाण म्हणाले, “मी जनतेला परिपूर्ण आरोग्य सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. जर माझ्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटले असेल, तर मी माघार घेतो व दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, उद्या जर गरजू रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळाली नाही, तर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यवाहीसाठी माझ्यासमोर उभे राहावे लागेल.”
“तुम्ही गरजू रुग्णांना खरी सेवा न देता उलट उद्धट भाषेचा वापर करता, हे योग्य आहे का? रुग्णांशी आरोग्य कर्मचारी माफी मागतील का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधी म्हणून रुग्णांच्या तक्रारी विचारणे हा आपला अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये आणि कामकाजावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने आपण माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी, व्यवस्थेला स्पष्ट इशारा दिला आहे. रुग्णालयातील विविध सेवा पुरविण्याचे कंत्राट एकाच कंपनीला देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी ऐरणीवर आणला. जेवण व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आदी सेवांबाबत संबंधित कंपनीची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून, आगामी अधिवेशनात या कंपनीलाही जाब विचारला जाईल, असा इशाराही आ. पठाण यांनी दिला.
या संपूर्ण घडामोडींमुळे सर्वोपचार रुग्णालयातील व्यवस्थापन, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील तणाव उघडपणे समोर आला असून, आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे