
- जिल्हा प्रशासन व प्रोजेक्ट डीप यांच्यात सामंजस्य करार
गडचिरोली., 13 फेब्रुवारी (हिं.स.)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वंचित घटकांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी एक अभिनव पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि प्रोजेक्ट डीप (वन स्टेप फॉरवर्ड फाउंडेशन) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तर डीपचे सह-संस्थापक श्री. मुजामिल बैग यांनी करारावर स्वाक्षरी केली.
या पायलट प्रकल्पांतर्गत पात्र व वंचित कुटुंबांना अटीविरहित व न परतफेडीच्या स्वरूपातील एकरकमी रोख रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, लाभार्थी विशेषतः महिलांनी हा निधी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी—उपजीविकेची साधने, लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, घरकुल सुरक्षितता आदींसाठी—वापरून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी.
परंपरागत कल्याणकारी योजनांमध्ये मासिक अनुदानांवर भर दिला जातो; मात्र या प्रकल्पात “रूपांतरकारी गुंतवणूक” या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे. एकरकमी लक्षणीय निधी उपलब्ध झाल्यास कुटुंबांच्या आर्थिक प्रवासात मूलभूत बदल घडू शकतो आणि महिलांचे कुटुंबातील निर्णयक्षम स्थान अधिक बळकट होऊ शकते, हा या प्रयोगामागील प्रमुख विचार आहे.
संशोधनाधारित धोरणनिर्मितीचा पाया
या सहकार्याद्वारे गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा तळागाळातील अनुभव आणि रोख हस्तांतरण योजनांच्या रचना व मूल्यमापन क्षेत्रातील प्रोजेक्ट डीपचे तज्ज्ञत्व एकत्र येत आहे. तीन वर्षांच्या कालावधीत वैयक्तिक सर्वेक्षणे आणि गट चर्चांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा दारिद्र्य निर्मूलन व सामाजिक-आर्थिक उन्नतीवर होणारा दीर्घकालीन परिणाम अभ्यासला जाणार आहे.
या पायलटमधून निर्माण होणारी पुराव्याधारित माहिती भविष्यातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कल्याणकारी धोरणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
राज्य शासनाला संशोधनाधारित धोरण सहाय्य प्रदान करणाऱ्या प्रोजेक्ट डीपचे सह-संस्थापक मुजामिल बैग यांनी सांगितले की, “जगण्यापुरत्या सहाय्यापासून गुंतवणूककेंद्री दृष्टिकोनाकडे वळून आपण नागरिकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा मॉडेल उभारत आहोत. हा पुराव्याधारित दृष्टिकोन भविष्यातील कल्याणकारी धोरणांसाठी आदर्श ठरू शकतो.”
तीन वर्षांच्या या भागीदारीमुळे निधीचा परिणाम केवळ तात्काळ खर्चापुरता मर्यादित न राहता, गडचिरोलीतील कुटुंबांच्या जीवनमानात शाश्वत व सकारात्मक बदल घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond