
रायगड, 19 फेब्रुवारी (हिं.स.)।
खालापूर पोलीस ठाणे हद्दीत १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास कलोते मोकाशी ठाकुरवाडी (ता. खालापूर) येथे किरकोळ कारणावरून मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व साक्षीदार हे दोघे वेगवेगळ्या कारने घरी जात असताना आरोपी क्रमांक १ याच्या दुकानासमोर रस्त्यामध्ये काही खुर्च्या लावलेल्या होत्या. त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी रस्ता अपुरा पडत होता. यामुळे फिर्यादी व साक्षीदार यांनी त्या खुर्च्या बाजूला केल्या.
याच कारणावरून आरोपीने मनात राग धरून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी क्रमांक १ व इतर तीन अनोळखी आरोपींनी साक्षीदारास हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यापैकी एका अनोळखी आरोपीने लाकडी बांबूने डोक्यात व दोन्ही हातांवर प्रहार करून दुखापत केली. या घटनेप्रकरणी गु.र.नं. ५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 118(1), 115(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीसांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके