
रायगड, 19 फेब्रुवारी (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत कलोते मोकाशी ठाकुरवाडी (ता. खालापूर) येथे टपरीची तोडफोड, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीची गंभीर घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आदिवासी समाजातील असून आरोपींना याची माहिती असतानाही आरोपी क्रमांक १ हा दारूच्या नशेत फिर्यादी यांच्या टपरीसमोर आला. त्याने टपरीसमोरील पाण्याचे माठ, हांडे व दगड दरवाज्यावर आपटून तसेच प्लास्टिक खुर्च्यांची मोडतोड करून नुकसान केले.
याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी टपरीकडे गेले असता आरोपी क्रमांक १ यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. त्यानंतर आरोपी क्रमांक २ ने फिर्यादीस हाताबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादींच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. तसेच गावातील एका महिलेलाही हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी गु.र.नं. ५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 118(1), 115(2), 324(2), 351, 352, 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ (सुधारणा अधिनियम २०१५) चे कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2)(व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसडीपीओ, खालापूर विभाग, श्री. विशाल नेहुल करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके