धुळ्यात हळदीच्या कार्यक्रमातील हाणामारीत तिघांचा मृत्यू
धुळे, 19 फेब्रुवारी (हिं.स.) साक्री तालुक्यातील या घटनेत हळदीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत नवरीकडील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहिती
धुळ्यात हळदीच्या कार्यक्रमातील हाणामारीत तिघांचा मृत्यू


धुळे, 19 फेब्रुवारी (हिं.स.) साक्री तालुक्यातील या घटनेत हळदीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत नवरीकडील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू असताना हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव व नवरीकडील पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच या वादाने उग्र स्वरूप धारण केले. नवरदेवाच्या बाजूकडील काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत सुरेश सुपडूगीर गोसावी (रा. साक्री), साहिल सुरेशगिर गोसावी (रा. साक्री) आणि देवा रवींद्र पवार (रा. साक्री) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धुळे येथे हलविण्यात आले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. लग्नासारख्या मंगल प्रसंगी घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande