
दोहा, १९ फेब्रुवारी (हिं.स.) कार्लोस अल्कारज आणि इटालियन यानिक सिनर यांनी कतार ओपन २०२६ टेनिस स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत सरळ सेटमध्ये विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू अल्कारजने फ्रान्सच्या व्हॅलेंटाईन रॉयरचा ६-२, ७-५ असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये २-५ ने पिछाडीवर असूनही, अल्कारजने उल्लेखनीय पुनरागमन केले. सलग पाच गेम जिंकून सामना जिंकला. या महिन्याच्या सुरुवातीला तो ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून कारकिर्दीतील ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण टेनिसपटू ठरला. आता अल्कारज उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी रशियाच्या सातव्या मानांकित करेन खाचानोव्हशी सामना करणार आहे.
दरम्यान, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यानिक सिनरने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्सी पोपिरिनचा ६-३, ७-५ असा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतरची ही त्याची पहिलीच स्पर्धा आहे. सिनरने संपूर्ण सामन्यात जोरदार सर्व्हिस केली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला ब्रेक पॉइंट मिळू दिला नाही. उपांत्यपूर्व फेरीत सिनरचा सामना चेक रिपब्लिकच्या जाकुब मेन्सिकशी होणार आहे.
इतर सामन्यांमध्ये ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने रशियाच्या माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या डॅनिल मेदवेदेवचा ६-३, ६-४ असा पराभव करून गेल्या वर्षीच्या बार्सिलोना ओपननंतर पहिल्यांदाच क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, फ्रान्सच्या आर्थर फिल्सने आपल्याच देशाच्या क्वेंटिन हॅलिसचा ६-१, ७-६ (९/७) असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे