मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची नियुक्ती
सॅक्रामेंटो, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दीर्घकाळ या पदावर कार्यरत असलेल्या फिल स्पेन्सर यांची जागा घेणार आहेत. स्पेन्सर जवळपास
Indian-origin Asha Sharma


सॅक्रामेंटो, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दीर्घकाळ या पदावर कार्यरत असलेल्या फिल स्पेन्सर यांची जागा घेणार आहेत. स्पेन्सर जवळपास 40 वर्षे कंपनीसोबत राहिल्यानंतर निवृत्त होत असून ते यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत सल्लागाराच्या भूमिकेत राहणार आहेत. आशा शर्मा या थेट मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना रिपोर्ट करतील.

आशा शर्मा यांनी यापूर्वी मेटा आणि इन्स्टाकार्टमध्ये महत्त्वाच्या नेतृत्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये त्या एआय प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट लीडरशिप टीमचा भाग होत्या. त्यांनी मिनेसोटा विद्यापीठाच्या कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवसाय शिक्षण घेतले असून व्यवसाय वाढवणे आणि कठीण काळात संघांचे नेतृत्व करणे यामध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे.

नियुक्तीनंतर पाठवलेल्या आपल्या पहिल्या अधिकृत मेमोमध्ये आशा यांनी एक्सबॉक्सचे भविष्य आणि गेमिंगमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी उत्कृष्ट आणि सर्जनशील गेम्स तयार करण्यावर भर देत स्टुडिओंना अधिक बळ देण्याचे आश्वासन दिले. तसेच एक्सबॉक्स ब्रँडला नव्या जोमाने उभारी देत गेमिंगला केवळ एका हार्डवेअरपुरते मर्यादित न ठेवता पीसी, मोबाइल आणि क्लाउडवर विस्तार करण्याची दिशा त्यांनी स्पष्ट केली. गेमिंगमध्ये एआयचा वापर होणार असला तरी मानवी सर्जनशीलतेला धक्का बसू देणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

स्पेन्सर यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टने अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डचे 69 अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण केले होते. आता वाढती स्पर्धा, हार्डवेअरवरील दबाव आणि मोठ्या करारानंतरचे एकत्रीकरण ही आव्हाने आशा शर्मा यांच्यासमोर असतील. त्यांच्या नियुक्तीमुळे मायक्रोसॉफ्ट गेमिंगमध्ये एआय आणि क्लाउड आधारित भविष्यासाठी मोठे बदल अपेक्षित मानले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande