
मुंबई, 21 फेब्रुवारी (हिं.स.) - श्रीराम समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेड (एसएफएल) च्या उन्नती मुदत ठेव योजनेला केअर रेटिंग्जने 'केअर एएए; स्टेबल' हा पतमापन दर्जा बहाल केला आहे. या पतमापन दर्जातून कंपनीची कर्जउभारणीची तसेच परतफेडीची क्षमता अतिशय मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर कंपनीची आर्थिक लवचिकता सक्षम असून वेळेवर ठेवीदारांचा निधी परत करण्याच्या बाबतीत उच्च दर्जाची सुरक्षितता असल्याचे या दर्जामुळे स्पष्ट झाले आहे.
केअर रेटिंग्जने कंपनीच्या कर्ज उभारणी पर्यायांबाबतही सकारात्मक दृष्टीकोन दर्शविला आहे. अनेक दीर्घकालीन कर्ज योजना आणि बँक सुविधांना 'केअर एएए; स्टेबल' दर्जा देत त्यांना उच्चश्रेणीत आणले आहे, तर अल्पकालीन व्यावसायिक कर्जपत्रांसह (कमर्शिअल पेपर) अल्पकालीन कर्जनिधी उभारणी पर्यायांना 'केअर ए१+' दर्जा पुन्हा बहाल करण्यात आला आहे.
याशिवाय, क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडने कंपनीच्या मुदत ठेव योजनेला 'क्रिसिल एए+/वॉच पॉझिटिव्ह' दर्जा प्रदान केला आहे. तर आयसीआरएने '(आयसीआरए) एए+' असा सुधारित दर्जा दिला आहे आणि सकारात्मक परिणामांसह नजर ठेवा गटात या योजनेला स्थान दिले आहे. सध्याच्या वाटचालीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती येणाऱ्या काळात आणखी बळक होणार असल्याची शक्यता यातून दर्शवते.
एमयूएफजीच्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे आणखी बळकटी
जगातील आघाडीच्या वित्तीय समूहांपैकी एक असलेल्या एमयूएफजीच्या धोरणात्मक गुंतवणूक प्रस्तावामुळे एसएफएलची निधीउभारणी क्षमता आणखी मजबूत झाली आहे. श्रीराम फायनान्सच्या व्यवसायाचे प्रारुप, प्रशासकीय मापदंड आणि दीर्घकालीन वाढीच्या धोरणावर जागतिक पातळीवरील संस्थांचा विश्वास एमयूएफजीच्या गुंतवणूकीतून अधोरेखित झाला आहे. उभय वित्तसंस्थांतील या भागीदारीमुळे कंपनीची आर्थिक लवचिकता वाढली आहे, परंतु त्याचबरोबर जागतिक निधी स्रोतांपर्यंत कंपनी सहज पोहचू शकते आणि दीर्घकालीन स्थिरतासुध्दा प्रदान झाली आहे. यामुळे आर्थिक चढउतारांदरम्यान रिटेल कर्जदार आणि निश्चित उत्पन्न गुंतवणूकदारांना वित्तीय सहाय्य पुरविण्याची एसएफएलची क्षमता आणखी मजबूत झाली आहे.
श्रीराम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवणकर म्हणाले, आम्हाला मिळालेला पतमापन दर्जा आमच्या आर्थिक ताकदीचे आणि गेल्या कित्येक वर्षांत आमच्या ठेवीदारांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासाचे अतिशय सक्षम प्रतिक आहे. आमच्या मुदत ठेवरुपी गुंतवणूकदारांना स्थिरता आणि आत्मविश्वास प्रदान करणे आहे, तसेच व्यवसायातील चउउतारादरम्यान योग्य रितीने वृध्दी साध्य करत राहणे, हे आमचे प्राधान्य आहे.
क्रिसिल रेटिंग्जने एसएफएलचा अल्पकालीन दर्जा 'क्रिसिल ए१+' वर पुन्हा बहाल केला आहे आणि बँक सुविधा आणि डिबेंचरसह अनेक दीर्घकालीन पर्यायांना सकारात्मक परिणामांसह नजर ठेवा गटात स्थान दिले आहे. यामुळे कंपनीने अलीकडच्या काळात राबविलेल्या धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती येणाऱ्या काळात आणखी सुधारणार असल्याची शक्यता यातून स्पष्ट होते.
कंपनीला मिळालेल्या विविध पतमापन दर्जातून श्रीराम फायनान्सची मजबूत मूलभूत तत्त्व, विवेकपूर्ण जोखीम व्यवस्थापन पद्धती आणि उत्पन्नाच्या बाबतीत लवचिक क्षमता प्रतिबिंबित होते. कर्जविषयक स्थिती अतिशय उत्तमपणे राखत वाढीचे उद्दीष्टय पूर्ण करण्यासाठी कंपनी अतिशय उत्तम स्थितीत असल्याचे यातून दिसून येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी