
मुंबई, 21 फेब्रुवारी, (हिं.स.)। रियलमीने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन रिअलमी P4 लाईट लॉन्च केला असून कमी किंमतीत दमदार बॅटरी आणि आकर्षक फीचर्स देण्यावर कंपनीने भर दिला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. विशेष ऑफर्ससह हा स्मार्टफोन 7,599 रुपयांतही खरेदी करता येणार असल्याने एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये तो चर्चेचा विषय ठरत आहे.
रिअलमी P4 लाईट मध्ये 6.74 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या या स्क्रीनला 90Hz रिफ्रेश रेट आणि 563 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसचा सपोर्ट आहे. 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 16.7 मिलियन रंगांमुळे दैनंदिन वापरात स्मूथ आणि स्पष्ट अनुभव मिळतो. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला असून तो 12nm प्रोसेसवर आधारित आहे. ग्राफिक्ससाठी Mali G57 MP1 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत डायनॅमिक रॅमचा सपोर्ट मिळतो.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास मागील बाजूस 13MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फोनमधून 1080p व्हिडिओ 30fps वर रेकॉर्ड करता येतो. मात्र या फोनची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे 6,300mAh क्षमतेची मोठी बॅटरी. 15W फास्ट चार्जिंग आणि 6W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर दोन दिवस सहज चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
हा स्मार्टफोन Android 15 आधारित रिअलमी यूआय वर चालतो. IP54 रेटिंगमुळे पाणी आणि धुळीपासून संरक्षण मिळते. यामध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.2, वाय-फाय, GPS यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आले आहेत. एआय कॉल नॉईज रिडक्शन, एआय इरेझर, एआय क्लिअर फेस यांसारखी आधुनिक फीचर्सही यात समाविष्ट करण्यात आली आहेत. कमी किंमत आणि दमदार बॅटरीमुळे हा फोन बजेट ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule