
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील कष्टकरी, कामकरी तसेच विविध व्यवसाय व सेवाक्षेत्रात कार्यरत कर्तबगार मातृशक्तींना मानवंदना देण्यासाठी ‘मातृशक्ती सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. Young India Business Club (महिला शाखा) यांच्या वतीने स्थानिक वेलकम इन सभागृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
यंग इंडिया बिझनेस क्लब महिला शाखेकडून दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. समाजातील विविध क्षेत्रांत पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या कामांमध्ये पुढाकार घेऊन उपजीविका करणाऱ्या तसेच उद्योग, व्यापार, सेवा व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात येतो.
विविध क्षेत्रांतील मातृशक्तीचा गौरव
घरगुती चक्की चालविणाऱ्या, ऑटो रिक्षा चालविणाऱ्या, पेट्रोल पंपावर कार्यरत असणाऱ्या, जोडे शिवणाऱ्या, भाजीपाला विक्री करणाऱ्या तसेच उद्योग-व्यवसाय सांभाळणाऱ्या आणि शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.. 27 व 28 फेब्रुवारी रोजी स्थानिक माहेश्वरी भवन येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जेष्ठ मातृशक्तींना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून 15 महिलांना ‘वायबीसी सन्मान रत्न पुरस्कार’ आणि 60 महिलांना ‘वायबीसी पुरस्कार रत्न’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
सन्मान सोहळ्याचा प्रारंभ 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता महिला उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेने होणार आहे. या कार्यशाळेत शासकीय कर्ज योजना, वित्तीय तरतुदी, कर्ज उभारणी प्रक्रिया, महिलांचे अधिकार, कायदे तसेच प्रशासकीय नियम याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना, आयपीएस अधिकारी ईशानी आनंद, महापौर शारदा खेडकर तसेच ज्येष्ठ समाजसेविका पद्मदेवी बाजोरिया यांना निमंत्रित करण्यात आले आहे.मुंबई, नागपूर, वर्धा, परभणी, जिंतूर, हैदराबाद, यवतमाळ, खामगाव, वाशिम, अमरावती आदी ठिकाणांहून महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. महिला उद्योग, व्यापार, प्रशासन व शासनविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पत्रकार परिषदेस वायबीसी अकोला चॅप्टरचे अध्यक्ष निलेश बियाणी, सचिव श्रीराम पांडे, कोषाध्यक्ष योगेश तिवारी तसेच महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
--------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे