
कोल्हापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.) कोल्हापूर विमानतळावर नवी टर्मिनस इमारत आणि विविध विकासकामे सुरू असताना शहराच्या पर्यटन व उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर आठवड्यातील सातही दिवस, सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रांमध्ये इंडिगो कंपनीकडून विमानसेवा सुरू होत आहे.
२९ मार्चपासून नवी मुंबई विमानतळ आणि कोल्हापूर दरम्यान इंडिगोची नवी सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
उड्डाण वेळापत्रक असे:-
* सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापूरकडे उड्डाण; सकाळी ९.१५ वाजता कोल्हापुरात आगमन.
* सकाळी ९.३५ वाजता कोल्हापूरहून प्रस्थान; सकाळी १०.३५ वाजता नवी मुंबई येथे आगमन.
* सायंकाळी ७.२० वाजता नवी मुंबईहून उड्डाण; सायंकाळी ८.३० वाजता कोल्हापुरात आगमन.
* रात्री ८.५० वाजता कोल्हापूरहून प्रस्थान; रात्री ९.५० वाजता नवी मुंबई येथे आगमन.
आठवड्यातील सातही दिवस ही सेवा उपलब्ध असल्याने कोल्हापुरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून त्याच दिवशी सायंकाळी परत येणे प्रवाशांना शक्य होणार आहे. ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घ मागणी होती.
या विमानसेवेसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला या मार्गावरील तिकीट दर सुमारे ७,६०० रुपये असणार आहे.
पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी ही नवी विमानसेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar