
लातूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। रेणापूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे गहू, हरभरा व इतर पिकांचे नुकसान झाले असून आंबा व द्राक्ष या फळबागांनाही फटका बसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.
अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त भागात पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न लावता सर्वेक्षण करून तातडीने मदत वितरित करावी. तसेच शेतकऱ्यांना पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis