
लातूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।कर्तव्य बजावताना जेष्ठ होमगार्ड शिवाजी पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन, शासकीय इतमातात केले अंत्यसंस्कार.औसा पोलीस स्टेशन येथे सेवा बजावत असलेले जेष्ठ होमगार्ड शिवाजी पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून शिवाजी पवार यांची ओळख होती. कोणतीही जबाबदारी असो, ती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणे हा त्यांचा स्वभाव होता. दि २१ फेब्रुवारी रोजी पहाटे औसा पोलीस ठाणे अंतर्गत सेवा बजावत असताना त्यांना अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र नियतीसमोर प्रयत्न अपुरे ठरले. त्यांच्यावर आज दुपारी औसा तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी याकतपूर येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस विभागाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. सहकारी अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.
शिवाजी पवार यांच्या निधनाने पोलीस व होमगार्ड दलाने एक कर्तव्यदक्ष सहकारी गमावला आहे. यावेळी होमगार्ड प्रमुख एकनाथ सुतार यांनी शिवाजी पवार हे आध्यात्मिक होते तर त्यांनी खंडापूर येथे संतांच्या पादुका आल्या तेंव्हा स्वतःहून सेवा घेत सेवा दिली आणि नियमित सेवेसाठी पुन्हा औसा पोलीस ठाण्यात हजर होऊन सेवा बजावत असताना नियतिने हरवले. एक चांगला साथी गमावल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले आहे तर त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis