जळगाव-अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना
जळगाव,, 26 फेब्रुवारी (हिं.स.)राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र यांच्यामार्फत परदेशात शिक्षणसाठी शिष्यवृत्
जळगाव-अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना


जळगाव,, 26 फेब्रुवारी (हिं.स.)राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र यांच्यामार्फत परदेशात शिक्षणसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र ४० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क तसेच आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक आकस्मिक खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी (यूके वगळून) १५०० यूएस डॉलर, तर यूकेसाठी ११०० जीबीपी इतकी रक्कम मंजूर करण्यात येईल. लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. संबंधित विद्यापीठाचे क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक राहील. पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत शिथिल करण्यात येईल तसेच क्यूएस रँकिंग मर्यादा ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा ३५ वर्षे, तर पीएचडीसाठी ४० वर्षे आहे. विद्यार्थ्यांनी TOEFL, IELTS किंवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. विहित नमुन्यातील अर्ज https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande