
रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) विद्यार्थी-विद्यार्थिनींमधून भविष्यात नवीन शास्त्रज्ञ तयार होतील आणि ते संशोधनात्मक काम करताना दिसतील, अशा शुभेच्छा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा व इस्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन आले. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, या उद्देशाने अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत आज भाट्ये किनारी हाय अल्टीट्युड बलून प्रक्षेपित करण्यात आला. त्यावेळी सौ. रानडे बोलत होत्या.
कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, कोस्टगार्डचे कमाडंट शैलेश गुप्ता, ग्रह स्पेसचे मलयकुमार बिस्वाल, प्रदीप राजन, सिलीकॉन टेक हिल्स रिसर्च फाऊंडेशनचे अजित गुरव, सागर साळुंखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, सरपंच प्रीती भाटकर, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून तसेच सिलिकॉन टेक हिल्स रिसर्च फाउंडेशन (सातारा) आणि ग्रह स्पेस (बेंगळुरू) यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या विविध तालुक्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय अंतराळ विज्ञान व उपग्रह तंत्रज्ञान विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम असून, तो राज्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
हाय अल्टीट्युड बलून लाँचसारख्या अत्याधुनिक वैज्ञानिक उपक्रमाचा समावेश करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेपण, ट्रॅकिंग व डाटा विश्लेषणाचा अनुभव देण्यात येत आहे. 15 किलोमीटर उंचीवर हा बलून जाऊन दोन ते अडीच तासाच्या कालावधीत हवामानाच्या दृष्टीने छायाचित्र घेणार आहे. त्याचा डाटा संकलित होणार असून, पुढच्या अभ्यासासाठी उपयोग होऊ शकतो.
श्रीमती रानडे पुढे म्हणाल्या, रत्नागिरी जिल्हा परिषदेने पहिल्यांदा महाराष्ट्रातला इस्रो आणि नासाचा अभ्यास दौरा सुरू केला आणि गेली तीन वर्षे तो सतत चालू आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना तीन प्रकारच्या चाचणी आपण घेतो आणि त्यातून स्क्रीनिंग होऊन जे विद्यार्थी निवडतो, त्यांना ही संधी मिळते. इस्रो आणि नासाला जाऊन आल्यावर पुढे काय, या एका विचारातून हा आजचा कार्यक्रम आहे. या सगळ्यातून संशोधक निर्माण व्हावेत आणि भारताची शान वाढवणारे काम तुमच्या हातून व्हावे. आपल्यातले वैज्ञानिक उद्या आम्हाला भेटतील. स्पेस ऑर्गनायझेशन तसेच अन्य शास्त्रामध्ये संशोधन काम करताना दिसतील, अशी आशा बाळगते. सगळ्या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.
श्री. बगाटे म्हणाले, रत्नागिरीच्या आपल्या भाट्ये बीचवरून प्रथमच हाय अल्टीट्युड बलून लाँच झाले. तुमच्या सर्वांच्या सगळ्यांच्या कार्यकुशलतेने हे झालेले आहे. आपल्यातल्याच विद्यार्थी मित्रांनी हे बनवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे या आपल्या भूमीच्या रक्षणासाठी जहाजांचे थवे उभे केले होते. आज तुमच्यातल्याच मावळ्यांनी इथे अभ्यासपूर्वक नासामध्ये प्रशिक्षण घेऊन इस्रोमध्ये प्रशिक्षण घेऊन सॅटॅलाइट बनवलेला आहे. निश्चितपणे उद्या भारत देशाचे नाव रोशन करणार आहात. याच्याबद्दल मला तुमचा खूप अभिमान आहे.
श्री. गुप्ता, सिलिकॉन टेक हिल्स रिसर्च फाउंडेशनचे रणजित येवले, विद्यार्थी अंशुल पाटील, शौर्य जाधव, शिवसमर्थ मुंडे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. लोहार यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला विविध तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी