
पठाणकोट , 26 फेब्रुवारी (हिं.स.) : भारतीय सेनेने पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अणु धमक्यांना ठाम प्रत्युत्तर देत कडक संदेश दिला आहे. सैन्याच्या पश्चिम कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत आता पाकिस्तानच्या अणु धमक्यांना घाबरणार नाही. सेनेची रणनीती बदलली असून पुढील कारवाई पूर्वीपेक्षा अधिक कठोर असेल. पंजाबच्या पठाणकोट येथे आयोजित लष्करी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेने जाहीर केले आहे की पाकिस्तानच्या अणु धमक्यांचा आता कोणताही परिणाम होणार नाही. पश्चिम कमानचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सेनेच्या रणनीतीत आमूलाग्र बदल झाला आहे. पुढील कारवाई अधिक कठोर आणि निर्णायक असेल. भारत आता केवळ प्रत्युत्तर देणार नाही, तर प्रत्यक्ष भूमीवर निर्णायक विजय मिळविण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लेफ्टनंट जनरल कटियार यांनी सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील प्रमुख दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली; मात्र भारतीय सेनेने त्यांच्या लष्करी आणि हवाई तळांनाही लक्ष्य करून मोठे नुकसान केले. परिस्थिती अशी निर्माण झाली की पाकिस्तानला थेट तसेच इतर देशांच्या माध्यमातून युद्धविरामाची मागणी करावी लागली. पुढील वेळी दिले जाणारे प्रत्युत्तर अधिक कठोर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
लेफ्टनंट जनरल कटियार यांनी पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अणुयुद्धाच्या धमक्यांना “न्यूक्लिअर ब्लफ” असे संबोधले. पाकिस्तान आपला कमकुवतपणा लपवण्यासाठी असली भंपकबाजी करीत असल्याचे कटियार म्हणाले. पाकिस्तानचे लष्करी नेतृत्व संघर्ष कायम ठेवून आपले महत्त्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे; परंतु कुणा खोडसाळपणा केल्यास आता आमचे प्रत्युत्तर मर्यादित राहणार नाही आणि शत्रूला जगासमोर पराभव मान्य करावा लागेल.
सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ‘ऑपरेशन सिंदूर’ हा केवळ विजयाचा उत्सव नव्हता, तर भविष्यातील तयारीचे प्रदर्शन होते. भारतीय सेना तांत्रिक स्वावलंबनाकडे वेगाने वाटचाल करत आहे. विशेषतः ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रसामग्री आणि शंभर टक्के सज्ज उपकरणांवर भर दिला जात आहे. तथापि, कोणत्याही युद्धात सर्वात मोठी ताकद भारतीय जवानच असतात, आणि त्यांचे प्रशिक्षण सातत्याने अधिक सक्षम केले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लेफ्टनंट जनरल कटियार यांनी सांगितले की धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही आणि सेना पूर्ण सतर्कतेने कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की भारतीय सैनिक कोणासमोरही झुकणारे नाहीत. पाकिस्तानने पुन्हा कोणतीही चूक केली, तर यावेळी कारवाई केवळ दहशतवादी तळांपुरती मर्यादित राहणार नाही, तर शत्रूला दीर्घकाळ लक्षात राहील अशी ठोस कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी