
जळगाव, 26 फेब्रुवारी (हिं.स.)जळगाव जिल्ह्याच्या दळणवळण आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सहापदरीकरणाचा मुद्दा विधानपरिषदेत पुन्हा एकदा गाजला. आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारला थेट प्रश्न विचारत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहात महत्त्वाची माहिती दिली.
एकनाथ खडसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ता सहा पदरी करून तो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडण्याची घोषणा केली होती. मात्र घोषणा होऊन बराच काळ लोटल्यानंतरही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “हा रस्ता नेमका कधी पूर्ण होणार? सरकारची पुढील कार्ययोजना काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा १०५ किलोमीटर लांबीचा मार्ग ‘खान्देश एक्सप्रेस’ या नावाने विकसित केला जाणार आहे. हा मार्ग सहापदरी स्वरूपाचा असेल आणि थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. डीपीआर पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर कमी वेळेत पार करता येणार आहे. जळगाव आणि खान्देश परिसरातील शेतीमाल, विशेषतः केळी, थेट समृद्धी महामार्गामार्गे मुंबई व नागपूरसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद पोहोचू शकतील. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील व्यापार आणि वाहतूक सुलभ होऊन औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर