
रायगड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।राज्यातील विविध मानाच्या कृषी पुरस्कारांसाठी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गटांनी सन २०२५ पासून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दिले जाणारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य आहे. शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती व संस्थांचा सन्मान दरवर्षी करण्यात येतो. हे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान केले जातात.
यापूर्वी प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागत होते. या प्रक्रियेमुळे वेळ व खर्च वाढत होता. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन प्रणालीमुळे घरबसल्या अर्ज सादर करणे शक्य होणार असून छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्चाची बचत होईल. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज भासणार नाही तसेच अर्जाची स्थितीही सहज पाहता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके