एफआयआर दाखल करून घ्या, रोहित पवार आणि बारामती पोलीस यांच्यात वादावादी
पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघात का आणि कसा झाला, याबाबत कोणतीही स्पष्टता मिळत नाही. तसेच काकांच्या अपघाती निधनात काही तरी संशयास्पद आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून कर
रोहित पवार बारामती


बारामती पोलीस ठाणे अजित पवार समर्थक


पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघात का आणि कसा झाला, याबाबत कोणतीही स्पष्टता मिळत नाही. तसेच काकांच्या अपघाती निधनात काही तरी संशयास्पद आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार आज बारामती पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलिसांसोबत वादावादी झाल्याची माहिती आहे. काल (बुधवारी) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात देखील रोहित पवारांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती, तर आज देखील बारामती पोलिस तक्रार घेतील या अपेक्षेने रोहित पवार गेले. पण पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. पोलिस एफआयआर दाखल करून घेत नसल्याने रोहित पवार आक्रमक झाले होते.

यावेळी युगेंद्र पवार, काही स्थानिक नेते, वकिल हे पोलिसांना काही गोष्टी व्यवस्थित पटवून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. मात्र पोलिस तक्रारीवरती ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी रोहित पवारांनी पोलिसांशी बोलताना म्हटलं की, आमची केस खोटी आहे, आमचा एफआयआर खोटा आहे असं सांगा मग, आम्हाला एफआयआर तरी द्या नाहीतर मी खोटं एफआयआर करतोय म्हणून माझ्यावरती कारवाई करून टाका. एक महिना झाला एक तरी स्टेटमेंट आलं आहे का सीआयडी कडून, सीआयडीने कोणाला बोलावलं का नाही, त्याचा मालक रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत बसला, सीआयडीने त्याला बोलावलं नाही, व्ही के सिंग जो मालक आहे, त्यालाही अद्याप पर्यंत बोलावलेलं नाही, त्या विमानाचा मेंटेनन्स करणारा जो त्यांचा माणूस आहे महाराष्ट्रातला त्यालाही अद्याप पर्यंत बोलावलेलं नाही, आतापर्यंत त्यांनी सीसीटीव्ही इथलेच गोळा केले आहेत, विमानात जे पायलट येणार होते ते अचानक कॅन्सल झाले, का कॅन्सल झाले? त्यांना आतापर्यंत बोलावलेलं नाही, मग नेमकं चाललं काय आहे, डीजीसीएच्या कोणत्या अधिकाऱ्याने या सगळ्याला मंजुरी दिली आहे, असंही यावेळी त्यांनी पोलिसांशी बोलताना सांगितलं आहे.

पुढे रोहित पवार म्हणाले, आम्ही जी माहिती दिली प्रेझेंटेशन केले त्यातील माहिती ती आमच्या लेवलला कळलेली माहिती आहे, पब्लिकला तर काहीच माहिती नाही, मी प्रेझेंटेशन केलं, चुका केले असतील, मला काउंटर तरी कोणी केला आहे का? केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री जिथे नसले पाहिजेत असं मी म्हणत असलो तरी मी त्यांच्या मंत्रालयाला देखील माहिती पाठवलेली आहे, व्हीएसआर कंपनीचे आणि डीजीसीएचे आणि नागरी उड्डयन मंत्र्यांची पार्टी आहे, त्या पार्टीचे आणि त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे, म्हणून हे व्हीएसआरला वाचवत आहेत, ते सर्वजण व्हीएसआरला वाचवत आहेत, त्यामुळे आमचं मत आहे की, तुम्ही देखील त्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही म्हणजे तुम्ही देखील त्यांना वाचवत आहात, त्याचबरोबर तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये दोनच गोष्टी आहेत एक टेक्निकल आणि दुसरा आहे अपघात, क्रिमिनल चौकशी कोण करत आहे, पाच लोकांच्या मृत्यूची एफआयआर तुम्ही घ्यावी एवढीच आमची मागणी आहे, बाकी आमचं काही म्हणणं नाही, अपघाताची एफआयआर दाखल करा, त्यानंतर प्रकरण सीआयडीकडे वर्ग करा, त्यांनी आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही, सीबीआयमध्ये आत्ता आपण बोलतोय पण 7000 पेक्षा जास्त केस प्रलंबित आहेत, 2600 केस दहा वर्ष झालं प्रलंबित आहेत, दादांना न्याय द्यायला आम्ही दहा वर्ष थांबू का? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान अजितदादांवर प्रेम करणारे अनेक बारामतीकर, राज्यातील नागरिकांसह कायदेशीर सहाय्य करण्यासाठी बारामती वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे आणि त्यांचे सर्व सहकारी हेही उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. यावेळी अजितदादांची केस लढवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. हे अजितदादांवरचं त्यांचं निस्सीम प्रेम असून ते कदापि कमी होणार नाही..!

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande