अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर, अनेक गंभीर त्रुटी उघड
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये कमी दृश्यमानता, VFR नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि अनकं
अजित पवार विमान अपघात


मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये कमी दृश्यमानता, VFR नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील सुरक्षा त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच मार्च 2016 मध्ये बारामती रनवेची शेवटची दुरुस्ती करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळानजीक अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याच अपघात प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आला आहे. दुर्घटनेच्या एका महिन्यानंतर हा प्राथमिक अहवाल आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या नॉन-शेड्युल्ड/VIP फ्लाइटच्या दुर्घटनेबाबतच्या प्राथमिक अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न करताना दृश्यमानता VFR (Visual Flight Rules) मर्यादेपेक्षा कमी असतानाही विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. पहिल्या प्रयत्नात पायलटने ‘Go-Around’ केले. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” अशी माहिती दिली. मात्र, त्या वेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने तीन किलोमीटर दृश्यमानता नोंदवली होती, जी VFR अंतर्गत आवश्यक 5 किलोमीटरपेक्षा कमी होती. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर काही क्षणांतच विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर झाडांवर आदळले. त्यानंतर लागलेल्या आगीत विमान पूर्णतः नष्ट झाले.

बारामती येथे अधिकृत MET (हवामान) सुविधा नसल्याची नोंद करण्यात आली आहे. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके (Shallow Fog) होते. त्याचवेळी पुणे आणि मुंबई येथे 2000 ते 2500 मीटर इतकी कमी दृश्यमानता नोंदवली गेली होती. फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) मधील डेटा डाउनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. मात्र कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) थर्मल डॅमेजमुळे खराब झाल्याने त्यातील डेटा पुनर्प्राप्तीसाठी अमेरिकेतील NTSB ची मदत घेतली जाणार आहे. अंतिम निष्कर्ष CVR डेटा मिळाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, दोन्ही वैमानिक अनुभवी होते आणि त्यांनी यापूर्वी बारामतीमध्ये गेले होते. उड्डाणापूर्वी अल्कोहोल चाचण्या घेण्यात आल्या, ज्या सामान्य असल्याचे आढळून आले. शवविच्छेदन अहवालात वैमानिकांच्या मृत्यूचे कारण अनेक जखमा आणि भाजलेल्या जखमा असल्याचे म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande