मध्य पूर्वेत वाढता तणाव, हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला तयारीचा आढावा
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। मध्य पूर्वेतील बदलती परिस्थिती आणि त्याचा आंतरराष्ट्रीय हवाई सेवांवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेत नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी सर्व संबंधित भागधारकांसह तयारी आणि प्रतिसाद उपाययोजनांचा व्यापक आढावा घेतला. या
Ministry of Civil Aviation


नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। मध्य पूर्वेतील बदलती परिस्थिती आणि त्याचा आंतरराष्ट्रीय हवाई सेवांवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेत नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी सर्व संबंधित भागधारकांसह तयारी आणि प्रतिसाद उपाययोजनांचा व्यापक आढावा घेतला.

या संदर्भात दूरदृश्य प्रणालीमार्फत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय, विमान कंपन्या आणि देशभरातील प्रमुख विमानतळ संचालक सहभागी झाले. या आढाव्यात प्रवाशांची सुरक्षा, सेवा सातत्य आणि प्रदेशातील विविध भागात लागू केलेले अनेक हवाई निर्बंध तसेच वैमानिकांसाठी सूचनांच्या (NOTAM) पार्श्वभूमीवर रिअल-टाइम समन्वय सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय सेवा चालवणाऱ्या भारतीय विमान कंपन्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या हवाई वाहतूक सल्ल्यावर, NOTAM सूचनांवर आणि मार्ग निर्बंधांवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमान कंपन्यांना जागतिक सुरक्षा प्रोटोकॉल आणि निश्चित आपत्कालीन नियोजन प्रक्रियेनुसार, आवश्यक असल्यास उड्डाणांची वेळ बदलण्याची किंवा वळवण्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देशभरातील विमानतळ, विशेषतः प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांना, संभाव्य उड्डाण वळवण्याच्या, अनियोजित लँडिंग करण्याच्या आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या व्यवस्थापनासाठी सतर्कतेच्या स्थितीत ठेवण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि खाजगी विमानतळ संचालकांना आवश्यकतेनुसार ग्राउंड हँडलिंग, पार्किंग बे, प्रवासी सुविधा, क्रू लॉजिस्टिक्स आणि इमिग्रेशन सपोर्टसाठी एअरलाइन्सशी अधिक समन्वय राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सुरक्षा नियम, क्रू ड्युटी वेळेची मर्यादा आणि कार्यकारी सल्ल्यांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला एअरलाइन्सशी जवळून समन्वय साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय, हवाई क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून देशांतर्गत वेळापत्रकावर होणारा संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सक्रिय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय विमान कंपन्या किंवा परदेशातील भारतीय नागरिकांशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन आवश्यकतांच्या बाबतीत अखंड माहिती प्रवाह आणि योग्य समन्वय सुनिश्चित करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयाशी देखील जवळून संपर्कात आहे.

प्रवाशांनी आपल्या प्रवासासंबंधी अद्ययावत माहिती आणि वेळापत्रक बदलांबाबत जाणून घेण्यासाठी संबंधित एअरलाइन्सशी नियमित संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गैरसोय कमी करण्यासाठी विलंब, मार्ग बदलणे किंवा वळवणे याविषयी प्रवाशांशी नियमित संवाद साधण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कार्यक्षम हवाई वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार पुढील माहिती जाहीर करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande