
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्राएल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी पुन्हा एकदा आगपाखड केली आहे. मोदींचा इस्राएल दौरा ‘लाजिरवाणा’ असून ‘अयोग्य वेळी’ करण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली. या भेटीमुळे लष्करी तणाव वाढविण्यासाठी राजकीय पाठबळ दिल्याची धारणा निर्माण होते, जी नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेबाबत भारताच्या ऐतिहासिक बांधिलकीच्या पूर्णतः विरोधात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार 25 आणि 26 फेब्रुवारीदरम्यान पश्चिम आशियात वाढलेला तणाव, संघर्षाची सुरुवात आणि व्यापक युद्धाच्या स्पष्ट धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा इस्राएल दौरा झाल्याबद्दल काँग्रेस ‘गंभीर चिंतेत’ असल्याचे म्हंटले आहे. खुर्शीद म्हणाले की, पंतप्रधानांचा हा दौरा अयोग्य वेळी झाला असून त्यामुळे पक्षपाती कल आणि आक्रमक कारवायांना मौन पाठिंबा दिल्याची छाप निर्माण होते. याचे गंभीर धोरणात्मक परिणाम होऊ शकतात. राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी विद्यमान सरकारला पाठिंबा दिल्याचा संदेशही या भेटीतून जाऊ शकतो, असे खुर्शीद म्हणालेत. पंतप्रधानांची ही भेट लष्करी तणाव वाढविण्यासाठी राजकीय पाठबळ दिल्याची धारणा निर्माण करते. नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांप्रती भारताची ऐतिहासिक बांधिलकी याच्या पूर्णतः विरोधात हा संदेश जातो. विशेषतः कोणत्याही देशाच्या प्रादेशिक अखंडतेविरुद्ध किंवा राजकीय स्वातंत्र्याविरुद्ध बळाचा वापर करण्यास असलेली मनाई आणि वादांचे शांततामय मार्गाने निराकरण करण्याच्या तत्त्वांच्या संदर्भात हे चिंताजनक असल्याचे खुर्शीद यांनी स्पष्ट केले. तसेच भारताचे परराष्ट्र धोरण ‘वसुधैव कुटुंबकम्’, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 51 मध्ये अधोरेखित आंतरराष्ट्रीय कायदे व करारांचे पालन करण्याच्या निर्देशांवर आधारित असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले.
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनीही पंतप्रधानांच्या इस्राएल भेटीवर टीका केली. जयराम रमेश म्हणाले की, मोदी यांच्या इस्राएल भेटीचा उत्सव साजरा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत इस्राएल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू केले. मागील काही महिन्यांतील अमेरिका-इस्राएल लष्करी जमाव पाहता हे पूर्णतः अपेक्षित होते. याप्रसंगी मोदींनी इस्राएलला जाऊन नैतिक कमकुवतपणा दर्शवल्याची विखारी टीका त्यांनी केली. भारत इस्राएलबरोबर उभा आहे आणि त्यासाठी स्वतःलाच बक्षीस मिळवले अशा शब्दात रमेश यांनी टीकास्त्र सोडले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी