
रायगड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। पाली पोलीस ठाणे हद्दीत मौजे आतोणे गावातील कुंभीचा माळ येथे विळे–पाली रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ७६ वर्षीय पादचारी महादेव बबन भिलारे (रा. कळंबोशी, पो. आतोणे, ता. सुधागड) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिलारे हे विळे–पाली रोडने पायी जात असताना रस्त्याने जाणाऱ्या किंवा येणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाने आपले वाहन अतिवेगाने व बेदरकारपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापती झाल्या. उपचारासाठी हलविण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.
धडक दिल्यानंतर अपघाताची माहिती न देता चालक घटनास्थळावरून पसार झाला. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पाली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 20/2026 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 134 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ढूमणे करीत आहेत.
दरम्यान, विळे–पाली मार्गावर वाढत्या वेगवान वाहनचालना आणि अपुऱ्या प्रकाशयोजनेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार असून, रात्रीच्या वेळी विशेष गस्त व वेगनियंत्रणाची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके