
रायगड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मौजे खैराट गावातील Oleander Farm and Resort येथे थरारक चोरीची घटना उघडकीस आली आहे. रिसॉर्टमधील रूम क्रमांक ४७१ मधून तब्बल १८,७६,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे व हिरेजडीत दागिने तसेच रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हैदराबाद येथील लक्ष्मीनगर कॉलनी, आत्तापुर परिसरातील रहिवासी असून ते आपल्या पत्नीसह नातेवाईकांच्या लग्नासाठी येथे आले होते. सायंकाळी ७.४५ या दरम्यान त्यांनी मौल्यवान दागिने व रोख रक्कम रिसॉर्ट व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेल्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली होती.
दरम्यान अज्ञात व्यक्तीने रूममध्ये प्रवेश करून लॉकरमधील सोन्याचे व हिरेजडीत दागिने तसेच रोख रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय काढून स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचे उघड झाले. घटनेमुळे रिसॉर्ट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 65/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे करीत आहेत.
दरम्यान, रिसॉर्टमधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही फुटेज आणि लॉकर व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिसांनी तांत्रिक तपासाला वेग दिला आहे. आरोपींचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके