
जळगाव, 28 फेब्रुवारी (हिं.स.) मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलने इराणवर हल्ला असून इराणही प्रत्युत्तर देत आहे. इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढली आहे. महागाईचे रेकॉर्ड तोडणारे सोने आणि चांदी या युद्धानंतर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान या युद्धानंतर जळगावच्या सराफ बाजारावर देखील मोठा परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे समोर आले आहे.अवघ्या दोन तासात सोन्या दरात तब्बल 1 हजार 500 रुपयांची पुन्हा मोठी वाढ झाली आहे. तर एकाच दिवसात सोन्याच्या दरात जवळपास 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही तब्बल 20 हजारांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या भावांमुळे सर्वसामान्यांचे सोने खरेदीचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर पोहोचले आहेत. आतापर्यंत सोन्याच्या भावातील ही सर्वात मोठी वाढ आहे. तर चांदीचे दर 2 लाख 98 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत.आज शनिवारी अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रे डागली. राष्ट्रपती कार्यालय, गुप्तचर कार्यालये, विमानतळ आणि सरकारी निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत युद्ध सुरू झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव आणि आता इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. जेव्हा जेव्हा जागतिक तणाव वाढतो तेव्हा सोने आणि चांदीच्या किमती सर्वात आधी वाढतात. सर्वात सुरक्षित आश्रयस्थान मानले जाणारे सोने गुंतवणूकदारांना आकर्षित करते आणि मागणीतील वाढ किमती वाढवते. यावेळीही परिस्थिती अशीच आहे. भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात, सोने आणि चांदी गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय बनतात. जागतिक तणाव वाढत असताना आणि शेअर बाजारात जोखीम वाढत असताना, गुंतवणूकदार बाजार सोडून सोन्यात गुंतवणूक करतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर