
अहमदाबाद, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। झायडूस लाइफसायन्स लिमिटेड ही जागतिक पातळीवरील नामांकित औषधनिर्मिती कंपनी आहे. विविध दुर्धर आजारांवर नवनवीन संशोधन करुन उपाययोजना राबवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. झायडूस आता देशात लवकरच सेमाग्लुटाइड हे इंजेक्शन लाँच करणार आहे. भारतात या औषधाचा पेटंट कालावधी संपल्यानंतर कंपनी हे इंजेक्शन सेमाग्लिन, मशेमा, अल्टरमे या तीन विविध ब्रँड नावांनी बाजारात उपलब्ध करुन देणार आहे. यापूर्वीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कंपनीला या इंजेक्शनकरिता आवश्यक परवानगी दिली आहे. या परवानगी अंतर्गतच टाइप-२ मधुमेह आणि स्थूलता यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या सेमाग्लुटाइड इंजेकश्नचे उत्पादन आणि विक्री केली जाईल. यामुळे मधुमेह आणि वजनाच्या समस्येशी लढणा-या रुग्णांना आता झायडूससारख्या विश्वासार्ह कंपनीची प्रभावी उपचार पद्धती अंमलात आणता येईल.
कंपनीच्या सेमाग्लुटाइड उपचार पद्धतीत आधुनिक औषध-प्रदान प्रणाली वापरण्यात आली आहे. ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आली आहे. हीच कंपनीची या उपचारपद्धतीची सर्वात महत्त्वाची आणि वेगळी ओळख ठरली आहे. सध्या रुग्णांना त्यांच्या डोसच्या गरजेनुसार वेगवेगळ्या डोसची इंजेक्शन्स विकत घ्यावी लागतात. याला पर्याय म्हणून झायडूस लाइफसायन्स लिमिटेड कंपनी ही एक अभिनव आणि समायोजित करता येणारे सिंगल-पेन डिव्हाइस बाजारात आणणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना एकाच पेनमधून स्वतःच्या गरजेनुसार डोसची तीव्रता कमी-जास्त करुन टोचून घेणे सुलभ होणार आहे. या नाविन्यपूर्ण शोधामुळे रुग्णांना वारंवार इंजेक्शन घेण्याची कसरत करावी लागणार नाही. त्यांची सोय वाढेल आणि औषधोपचारांच्या खर्चात कपात होईल.
झायडुस लाइफसायन्सेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शार्विल पटेल यांनी मधुमेहाच्या नव्या इंजेक्शनच्या निर्मितीबाबत कंपनीची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन झायडुसने हे इंजेक्शन तयार केले आहे. हे इंजेक्शन आमच्या नाविन्यपूर्ण संशोधनाचे आणि सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे. बाजारात महत्त्वाचे औषध उपलब्ध करुन उपचारांचा दर्जा वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भारतात अशा प्रकारचे औषध वितरणाचे पहिलेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर केले जाणार आहे. यासह आम्ही उपचारपद्धती अधिक सुलभ आणि सोपी करणार आहोत. सुलभतेच्या या नव्या पावलामुळे रुग्णांना दीर्घकाळापर्यंत नियमितपणे उपचार घेणे सोपे जाईल. परिणामी, त्यांच्या आरोग्यात सुधारणा घडून येईल.’’
झायडूस कंपनीकडे या अत्याधुनिक विशेष उपकरणाचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. हे उपकरण रुग्णांना टाइप-२ मधुमेह आणि स्थूलतेच्या उपचारांसाठी मंजूर असलेल्या सर्व कार्यक्षम मात्रा रुग्णांना देण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे पेन पुन्हा वापरण्यायोग्य असल्याने रुग्णांना अत्यंत किफायतशीर ठरेल. या फेरवापराच्या सोयीमुळे रुग्णांवरील आर्थिक भार कमी होईल. परिणामी, अत्याधुनिक उपचार पद्धती आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यास मदत होईल.
सध्या देशात मधुमेह आणि स्थूलतेने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीएलपी-१ वर आधारित उपचार पद्धती अत्यंत प्रभावी ठरु शकते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, भारतात तब्बल ८.९ कोटी प्रौढ वयोगटातील रुग्ण मधुमेहबाधित आहेत. प्रौढ लोकसंख्येपैकी १०.५ टक्के लोकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांत प्रौढ महिलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण ९१ टक्क्यांनी (१२.६ टक्क्यांवरुन थेट २४ टक्क्यांपर्यंत) वाढले. पुरुषांमधील हे प्रमाण १४६ टक्क्यांनी (९.३ टक्क्यांवरुन थेट २२.९ टक्क्यांपर्यंत) वाढले. सर्व वयोगटात स्थूलतेचे रुग्ण वाढले आहे. मधुमेह आणि स्थूलतेचे वाढते रुग्ण हे आरोग्य व्यवस्थेसमोरील राष्ट्रीय संकट ठरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर