बोत्सवाना येथून १२ तासांच्या हवाई प्रवासानंतर ९ चित्ते कूनो येथे दाखल; एकूण संख्या ४८ वर
भोपाळ, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यान येथे नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. बोत्सवाना येथून १२ तासांचा हवाई प्रवास करून ९ चित्ते शनिवारी सकाळी कूनो येथे पोहोचले. सध्या भारतात चित्त्यांची संख्या ३९ होती; बोत्सवाना येथू
MP-Botswana-cheetah-Kuno-National-Park


भोपाळ, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यान येथे नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. बोत्सवाना येथून १२ तासांचा हवाई प्रवास करून ९ चित्ते शनिवारी सकाळी कूनो येथे पोहोचले. सध्या भारतात चित्त्यांची संख्या ३९ होती; बोत्सवाना येथून आलेल्या ९ चित्त्यांमुळे ही संख्या आता ४८ वर पोहोचली आहे.

पूर्वी मिळालेल्या माहितीनुसार बोत्सवानातून ८ चित्ते (६ मादी, २ नर) भारतात आणले जाणार होते. मात्र शनिवारी सकाळी विशेष विमानाने ग्वाल्हेर येथे एकूण ९ चित्ते पोहोचले, त्यापैकी ६ मादी आणि ३ नर आहेत. ग्वाल्हेरहून हेलिकॉप्टरद्वारे सकाळी सुमारे ९.३० वाजता त्यांना कूनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. येथे आणल्यानंतर सर्व चित्त्यांना थेट क्वारंटाईन कुंपणांमध्ये हलविण्यात आले.

चित्त्यांच्या आगमनावेळी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव स्वतः कूनो येथे उपस्थित होते. त्यांनी क्रेटचा हँडल फिरवून दोन चित्त्यांना क्वारंटाईन कुंपणात सोडले. उर्वरित चित्त्यांना वन विभागाच्या प्रशिक्षित पथकाने निश्चित प्रोटोकॉलनुसार हलविले.

कूनोमध्ये यापूर्वी २६ प्रौढ चित्ते होते, त्यात १४ नर आणि १२ मादींचा समावेश होता. नव्याने आलेल्या ९ चित्त्यांमुळे प्रौढांची संख्या ३५ झाली असून त्यात आता १८ मादी आणि १७ नर चित्ते आहेत. आतापर्यंत कूनोमध्ये नर चित्त्यांचे प्रमाण जास्त होते; मात्र या नव्या खेपेमुळे लिंग संतुलन सुधारले आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे येत्या काही महिन्यांत प्रजननाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

बोत्सवानातून आलेल्या सर्व ९ चित्त्यांना एक महिना क्वारंटाईन कुंपणांमध्ये ठेवण्यात येणार आहे. या काळात त्यांच्या आरोग्याची, वर्तनाची आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची सातत्याने पाहणी केली जाईल. त्यानंतर चीता स्टीयरिंग समिती कोणत्या चित्त्यांना मोकळ्या जंगलात सोडायचे आणि कोणाला देखरेखीखाली ठेवायचे, याचा निर्णय घेईल. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, प्रत्येक चित्त्याला जंगलात सोडण्यापूर्वी त्याच्या हालचाली, शिकार करण्याची प्रवृत्ती आणि मानवी हस्तक्षेपापासूनचे अंतर या बाबींची सखोल तपासणी केली जाते.

अरावली पर्वतरांगेतील निसर्गरम्य टेकड्यांच्या सान्निध्यात वसलेले कूनो राष्ट्रीय उद्यान जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे सुमारे १७४ पक्षीप्रजाती आढळतात. त्यापैकी १२ प्रजाती दुर्मीळ श्रेणीत गणल्या जातात. याशिवाय शेकडो प्रकारचे वन्यजीव येथे आढळतात. उद्यानातून वाहणारी कूनो नदी या परिसराच्या सौंदर्यात अधिक भर घालते. तिच्या सपाट व विस्तीर्ण काठांवर उन्हात विसावलेले मगर पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात.

१९५२ मध्ये भारतात आशियाई चित्ते नामशेष झाल्यानंतर देशात पुन्हा चित्त्यांची पुनर्स्थापना करण्याची योजना सुरू करण्यात आली. याच उद्देशाने सप्टेंबर २००९ मध्ये राजस्थानातील गजनेर येथे चित्ताविषयक तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चीता संरक्षण कोषाच्या डॉ. लॉरी मार्कर, स्टीफन जे. ओ’ब्रायन आणि इतर तज्ज्ञांनी दक्षिण आफ्रिकन चित्ते भारतात आणण्याची शिफारस केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande