
-विधिमंडळाकडे दुरुस्तीची मागणी करणारी याचिका दाखल
- स्वातंत्र्ययुद्धाला ‘उठाव’ ठरवण्याच्या खटाटोपावर घेतला आक्षेप
नागपूर, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशात 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाचा उल्लेख ‘उठाव’ असा करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा अवमान केल्याचा आरोप करत पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी राज्य विधिमंडळाच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.
याचिकेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 1857 मधील संघर्ष हा केवळ ‘उठाव’ किंवा ‘बंड’ नव्हता, तर तो भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले पहिले सशस्त्र स्वातंत्र्ययुद्ध होते. याबाबत विनायक दामोदर सावरकरांनी “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” हा ग्रंथ लिहून ऐतिहासिक भूमिका मांडली आहे, याचीही आठवण करून देण्यात आली आहे. मराठी विश्वकोशाच्या खंड-1 आणि खंड 18 मध्ये स्वातंत्र्ययुद्धांतील घटनांचा उल्लेख ‘अठराशे सत्तावनचा उठाव’ असा करण्यात आला असून, काहींनी त्याला ‘बंड’ तर काहींनी ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हटल्याचे नमूद केले आहे. मात्र, याचिकाकर्त्यांच्या मते हा संदिग्ध उल्लेख इतिहासाशी अन्याय करणारा आहे.
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यसेनानी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब आणि तात्या टोपे यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. “देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या महनीय योद्ध्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख व्हावा, ही किमान अपेक्षा आहे,” असे याचिकेत ठामपणे म्हटले आहे.झाशीच्या राणीने स्वातंत्र्यरक्षणासाठी तटावरून घोडा उडी मारून बलिदान दिले, तर तात्या टोपे फासावर चढले या बलिदानांचा गौरव इतिहासात अढळ आहे. वसंत वरखेडकर यांच्या “सत्तावनचा सेनानी” या कादंबरीतही या शौर्यगाथेचे वर्णन आढळते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
विधिमंडळाच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे धडक
नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांच्या पुढाकाराने ही याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, विनोद देशमुख, श्रुती देशपांडे, महेश आंबोकर, विजय आडे, चारुदत्त कहू, उदय अंधारे, संजय लोखंडे, दीपक देशपांडे, कार्तिक लोखंडे, अरविंद मराठे, मेजर जनरल अच्युत देव, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरु, नितीन केळकर, एड. लखनसिंह कटरे आणि शशिकांत सुरंगळीकर आदींच्या सह्या आहेत.
मुख्यमंत्री व मंत्र्यांशी पत्रव्यवहार
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, यासाठी याचिकेच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंतयांनाही पाठवण्यात आल्या आहेत. संबंधित विश्वकोशातील पानांच्या झेरॉक्स प्रतीही जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
इतिहास दुरुस्त करा, स्वाभिमान जपा
“इतिहासाचा संदर्भ बदलणे म्हणजे राष्ट्रीय स्वाभिमानाला धक्का देणे,” असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. पुढील खंडांमध्ये तसेच संकेतस्थळावर तातडीने दुरुस्ती करून 1857 च्या लढ्याचा ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असा स्पष्ट उल्लेख करावा आणि स्वातंत्र्यवीरांचा सन्मानपूर्वक उल्लेख करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर राज्य सरकार आणि विधिमंडळ काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी