
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले असून इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. इराणची राजधानी तेहरानसह अन्य सहा शहरांवर क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट झाल्याचे सांगितले जात असून, या हल्ल्यात इराणचे लष्कर प्रमुख ठार झाल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, या वृत्तांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, इस्रायलने आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. इराणकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिस्थिती अधिक चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणामाची शक्यता
या संघर्षाचा परिणाम केवळ संबंधित देशांपुरता मर्यादित न राहता जगभर जाणवू शकतो. इराण हा महत्त्वाचा तेल उत्पादक देश असल्याने युद्ध दीर्घकाळ चालल्यास जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताच्या तेलाच्या सुमारे 80 टक्के गरजा आयातीद्वारे भागवल्या जातात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल एका डॉलरची वाढ झाली तरी भारताचे वार्षिक आयात बिल सुमारे 9,000 कोटी रुपयांनी वाढू शकते. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांवर होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम अन्नधान्य तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होऊन महागाई वाढू शकते.
नैसर्गिक वायू, एलपीजी आणि विमान इंधनावर परिणाम
कच्च्या तेलासोबतच नैसर्गिक वायूच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. एलपीजी, सीएनजी तसेच विमान इंधन महाग झाल्यास घरगुती गॅसपासून विमान प्रवासापर्यंत सर्वच क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
सुरक्षित गुंतवणुकीकडे कल
युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. अशा वेळी सोने आणि चांदीला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. जागतिक अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मागील काही वर्षांत सोन्यात गुंतवणूक वाढवली असून सध्याच्या परिस्थितीत हा कल आणखी वेग घेऊ शकतो.
शेअर बाजारात अस्थिरता
भारतीय शेअर बाजारावरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच जागतिक संकेतांमुळे बाजार अस्थिर असताना मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली गुंतवणूक कमी केल्यास बाजारात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र काही विश्लेषकांच्या मते, भारताची अर्थव्यवस्था तुलनेने स्थिर असल्याने परिणाम मर्यादित राहू शकतो. तरीही अल्पकालीन अस्थिरतेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत-इराण व्यापारावर परिणाम
अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे भारत-इराण व्यापारात आधीच घट झाली आहे. 2024-25 आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील एकूण व्यापार सुमारे 1.68 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. यापैकी भारताने 1.24 अब्ज डॉलर्सची निर्यात केली, तर इराणकडून 0.44 अब्ज डॉलर्सची आयात झाली होती. नव्या संघर्षामुळे या व्यापारावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किमती 91 डॉलर्सपर्यंत?
जागतिक तेल उत्पादनात इराणचा वाटा सुमारे 4-5 टक्के आहे. त्यामुळे पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास तेलाच्या किमती वाढू शकतात. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 71 अमेरिकन डॉलर्स आहे. मात्र संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास ती 91 डॉलर्सपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
तेलदरवाढीमुळे भारताची वित्तीय तूट वाढण्याची आणि रुपयावर दबाव येण्याची शक्यता आहे. परिणामी देशांतर्गत इंधनदर वाढून महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो.एकूणच, मध्य-पूर्वेतील वाढता तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले असून पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule