
अंकारा, 03 फेब्रुवारी (हिं.स.)।तुर्किये या आठवड्याच्या अखेरीस अमेरिका आणि इराण यांच्यात एक बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नामागील मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील वाढता तणाव आणि युद्धाचा धोका कमी करणे हा आहे. मात्र, अमेरिका किंवा इराण —दोन्हींपैकी कुणीही अद्याप कोणत्याही चर्चेत सहभागी होण्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
तुर्कियेच्या अधिकाऱ्यांची इच्छा आहे की अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे वरिष्ठ नेते यांच्यात थेट संवाद साधला जावा. दरम्यान,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. कोणताही तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली असली तरी, चर्चा अपयशी ठरल्यास परिणाम अतिशय गंभीर असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्य पूर्वेत आपली लष्करी उपस्थिती वाढवत शक्तिशाली युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन तसेच अनेक क्षेपणास्त्र-विध्वंसक (मिसाइल डेस्ट्रॉयर) जहाजे तैनात केली आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणमध्ये सत्ताबदल करण्याच्या कोणत्याही योजनेचा सध्या नकार दिला आहे.
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत लष्करी सराव सुरू केला आहे. हा समुद्री मार्ग जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अमेरिका यांनी इराणला कडक इशारा देत व्यापारी जहाजे किंवा अमेरिकी युद्धनौकांच्या कामकाजात अडथळा आणू नये, असे बजावले आहे. उपग्रह छायाचित्रांमध्ये या भागात इराणी नौदलाची हालचाल स्पष्टपणे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode