उत्तर जपानमध्ये मुसळधार हिमवृष्टी, ३५ जणांचा मृत्यू
टोकियो, 04 फेब्रुवारी (हिं.स.)।गेल्या दोन आठवड्यांपासून उत्तर जपानमध्ये सातत्याने जोरदार बर्फवृष्टी होत असून, या भीषण हवामानामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश मृत्यू अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांमुळे किंवा छतावरून बर्
उत्तर जपानमध्ये मुसळधार हिमवृष्टी, ३५ जणांचा मृत्यू


टोकियो, 04 फेब्रुवारी (हिं.स.)।गेल्या दोन आठवड्यांपासून उत्तर जपानमध्ये सातत्याने जोरदार बर्फवृष्टी होत असून, या भीषण हवामानामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश मृत्यू अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांमुळे किंवा छतावरून बर्फ काढताना घसरून पडल्यामुळे झाले आहेत.

जपानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत 15 प्रीफेक्चर्स या हिमवृष्टीमुळे बाधित झाले असून, सर्वाधिक प्रभावित भागांमध्ये तब्बल 2 मीटर (सुमारे 6.5 फूट) इतका बर्फ साचला आहे. सर्वाधिक 12 मृत्यू निगाता प्रीफेक्चरमध्ये नोंदवले गेले आहेत. हा भाग उत्तर जपानमधील प्रमुख तांदूळ उत्पादक क्षेत्र आहे. निगातामधील उओनुमा शहरात 21 जानेवारी रोजी 50 वर्षीय व्यक्तीचा घराच्या छतावरून घसरून मृत्यू झाला. तसेच नागाओका शहरात 70 वर्षीय एक व्यक्ती घरासमोर पडलेल्या अवस्थेत आढळली; रुग्णालयात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ते छतावरील बर्फ काढताना घसरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

निगाता व्यतिरिक्त अकिता प्रीफेक्चरमध्ये 7 तर यामागाता प्रीफेक्चरमध्ये 5 मृत्यू झाले आहेत. हिमवृष्टीमुळे संपूर्ण देशात भूस्खलन आणि रस्त्यांवरील घसरपट्टीचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 393 जण जखमी झाले असून, त्यापैकी 126 जणांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये निगातामध्ये 42 जखमींचा समावेश आहे. याशिवाय 14 घरे नुकसानग्रस्त झाली असून, त्यात निगातामधील 3 आणि अओमोरीमधील 8 घरांचा समावेश आहे.

मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरू किहारा यांनी हवामान उष्ण होताच बर्फ वितळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे भूस्खलन आणि घसरण्याचा धोका अधिक वाढेल, असा इशारा दिला आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले, “सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्या. बर्फ काढताना हेल्मेट वापरा किंवा सुरक्षेसाठी दोरी (लाइफलाइन) वापरा.”

20 जानेवारीपासून सुरू झालेल्या या जोरदार हिमवृष्टीसाठी विविध टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. मृत्यू आणि अपघातांची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी जपानमध्ये हिवाळ्यात बर्फाशी संबंधित मृत्यू सामान्य मानले जातात. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार, मागील वर्षी सहा हिवाळी महिन्यांत 68 जणांचा मृत्यू झाला होता.

आगामी आठवड्याच्या शेवटी आणखी जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बर्फ हटवणे आणि अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सेल्फ-डिफेन्स फोर्सेस (लष्कर) तैनात करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी छतावरून बर्फ कोसळणे, भूस्खलन आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या धोक्याबाबतही इशारा दिला आहे.

ही हिमवृष्टी जपानच्या ‘सी ऑफ जपान’ किनारपट्टीवर (निगाता, अकिता, अओमोरी आदी भागांमध्ये) अधिक प्रमाणात झाली आहे. सायबेरियातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे या भागांत विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे. अओमोरीमध्ये 183 सेंटीमीटर इतका बर्फ साचला असून, गेल्या 40 वर्षांतील ही सर्वाधिक नोंद आहे. सरकारने मदतकार्य वेगाने सुरू केले असले, तरी हवामानाविषयी इशारे कायम ठेवण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande