लातूर जिल्ह्यात मटका व अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांची धडक कारवाई
एकाच दिवशी १४ आरोपींविरुद्ध १४ गुन्हे दाखल लातूर, 04 फेब्रुवारी (हिं.स.) :लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मटका जुगार व अवैध मद्यविक्रीसारख्या बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस द
लातूर पोलीस


एकाच दिवशी १४ आरोपींविरुद्ध १४ गुन्हे दाखल

लातूर, 04 फेब्रुवारी (हिं.स.) :लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मटका जुगार व अवैध मद्यविक्रीसारख्या बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाने व्यापक व कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत एका दिवसात मटका व दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण १४ आरोपींविरुद्ध १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लातूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मटका जुगारप्रकरणी एकूण 08 गुन्हे दाखल झाले असून गांधी चौक, शिवाजीनगर, विवेकानंद व विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली. तर दारूबंदी कायद्याअंतर्गत एकूण 06 गुन्हे दाखल करण्यात आले असून गांधी चौक, गातेगाव, उदगीर शहर, वाढवना व कासार सिरसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण १४ आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच संबंधित आरोपी भविष्यात पुन्हा अवैध धंद्यांमध्ये सहभागी होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पुन्हा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, “लातूर जिल्ह्यात मटका, जुगार व अवैध मद्यविक्री यांसारख्या समाजविघातक धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने व सातत्याने सुरू राहणार आहेत.”

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande