
मुंबई, 04 फेब्रुवारी, (हिं.स.)। झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सच्या बहुप्रतीक्षित ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी आलेल्या टीझरने भावनिक वातावरण निर्माण केले होते, तर ट्रेलरमधून या कथेची दुनिया अधिक सखोलपणे उलगडताना दिसते. सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांचr प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेमकथेचा गोड, स्वप्नाळू परीसारखा रंग न रंगवता, प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभवांसारखा वास्तववादी दृष्टिकोन मांडतो. हा चित्रपट २० फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाची कथा शहराच्या धावपळीच्या आयुष्यात फुलणाऱ्या एका नात्याभोवती फिरते. ट्रेलरमध्ये दोन अशा व्यक्तिरेखांची भेट दाखवण्यात आली आहे, ज्या एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न न करता, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांची जवळीक मोठ्या गोंगाटातून नव्हे, तर शांत क्षणांतून, अपूर्ण संवादांतून आणि छोट्या-छोट्या भावनिक जाणिवांतून निर्माण होते. हे नाते हळूहळू पुढे सरकते आणि प्रत्येक टप्प्यावर एक नवा अनुभव देत जाते.
सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री ही ट्रेलरची सर्वात मोठी जमेची बाजू ठरते. दोघेही स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासात असलेल्या व्यक्तिरेखा साकारताना दिसतात आणि याच प्रवासात ते एकमेकांशी जोडले जातात. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवि उद्यावर यांनी केले असून, संजय लीला भन्साली, प्रेरणा सिंग, उमेश कुमार बन्सल आणि भारत कुमार रंगा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर