
अकोला, ०५ फेब्रुवारी (हिं.स.) : अकोला महानगरपालिका क्षेत्रात अतिक्रमणाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गांधी रोडवरील ‘बिंदी घर’ नावाच्या दुकानाने उभारलेल्या दोन मजली टीनशेड अतिक्रमणावर मनपाच्या अतिक्रमण विभागामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त विजय पारतवार तसेच पूर्व झोन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेण्यात आले होते.
या वेळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गवई, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र उगवेकर, सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, पूर्व झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार यांच्यासह महिला व पुरुष पोलीस कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
मनपा प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे